लुधियाना - पंजाबच्या लुधियाना येथे 118 वर्षे महिलेवर यशस्वरित्या शस्त्रक्रिया करून पेसमेकर लावण्यात डॉक्टरांना यश आले आहे. करतार कौर सांघा असं या महिलेचं नाव आहे. या शस्त्रक्रियेनंतर महिलेची प्रकृती स्थिर आणि उत्तम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 118 वयाच्या महिलेला पेसमेकर लावणे हा एकप्रकारे रेकॉर्ड आहे. या शस्त्रक्रियेची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यासाठी डॉक्टर प्रयत्न करणार आहेत.
लुधियाना येथील प्रसिद्ध रूग्णालय एसपीए याठिकाणी ही शस्त्रक्रिया करण्यात आली. रूग्णालयाचे डॉक्टर रवनिंदर सिंग कूका यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांच्या टीमने या महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया केली. वयोवृध्द वयातील कोणालाही अशारितीने पेसमेकर लावणे हे खरंतरं एक आव्हान असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
करतार कौर यांचा जन्म 1903 मध्ये झाला होता, यासाठी डॉक्टरांनी करतार यांच्या छोट्या भावाचा जन्मदाखलाही बघितला असल्याचं सांगितले. करतार कौर यांच्या मुलीचे वय 88 वर्षे आहे. करतार कौर यांना पेसमेकर लावल्यानंतर त्यांचे शरीर उत्तमरित्या साथ देत असल्याचे डॉक्टर म्हणाले.
डॉ. कूका यांनी सांगितले की, 24 फेब्रुवारीला ही महिला रूग्णालयात दाखल झाली. त्यावेळी त्यांच्या हृदयाचे ठोके 20-22 प्रति मिनिट असे होते. त्यावेळी त्या बेशुध्द अवस्थेत होत्या. त्यांच्या हृदयाचे ठोके वाढविण्यासाठी त्यांना तात्पुरते पेसमेकर लावण्यात आले. त्यानंतर त्यांच्या हृदयाचे ठोके वाढण्यास सुरुवात झाली.
पेसमेकर म्हणजे काय ?
हृदयाशी संबंधित उपचारांमध्ये पेसमेकर बसवणे हा एक महत्त्वाचा उपचार आहे. पेसमेकरच्या साहाय्याने हृदयाची बिघडलेली लय पूर्वपदावर आणणे शक्य होते व ती व्यक्ती सामान्य जीवन जगू शकते. हृदयाचे ठोके नियंत्रित करण्यासाठी याचा वापर केला जातो असं हृदयविकार तज्ज्ञ डॉ. विजय बंग यांनी सांगितले.