'जंगलाच्या एन्सायक्लोपिडिया'ला पद्मश्री; 'हिरवंगार' काम पाहून प्रसन्न वाटेल!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 09:58 AM2020-01-28T09:58:25+5:302020-01-28T09:58:44+5:30
उल्लेखनीय आणि विधायक कार्याची दखल घेत सरकारने या पुरस्कारांची घोषणा केली.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारच्यावतीने पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यंदा 7 दिग्गजांना पद्मविभूषण, 16 मान्यवरांना पद्मविभूषण आणि 118 जणांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात येणार आहे. उल्लेखनीय आणि विधायक कार्याची दखल घेत सरकारने या पुरस्कारांची घोषणा केली. भारत सरकारच्या पद्मश्री पुरस्कारांच्या यादीत 'जंगलाच्या एनसायक्लोपिडिया' म्हणून ओळखले जाणाऱ्या कर्नाटकातील तुलसी गौडा यांचा देखील समावेश आहे.
वनसंवर्धन, पर्यावरण, झाडे आणि रोपांचे मोठ्या प्रमाणात ज्ञान असल्यामुळे तुलसी गौडा यांना 'एनसायक्लोपीडिया ऑफ फॉरेस्ट' असे म्हटले जाते. कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्याच्या अंकोला तालुकामधील होन्नाळी गावात तुलसी गौडा यांचा जन्म झाला. तुलसी गौडा यांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे त्या आईसोबत शेतामध्ये मजुरीसाठी जायच्या. तसेच तुलसी गौडा यांचा कमी वयात लग्न झालं. पण त्यांचे पती गोविंद यांचं काही वर्षातच निधन झाले. पण अशा बिकट परिस्थितीतही न डगमगता तुलसी गौडा यांनी पर्यावरणाविषयीचं आपलं प्रेम जरासुद्धा कमी होऊ दिलं नाही.
तुलसी गौडा यांनी आतार्पयत एक लाखांपोक्षा जास्त झाडे लावली आहे. वृक्षरोपणाबाबत प्रचंड आवड असल्यामुळे त्यांना वनविभागाने नोकरी करण्याची संधी दिली. त्यानंतर तुलसी गौडा यांनी जवळपास 14 वर्ष वनविभागात काम केले. कामपासून निवृत्ती घेत्यानंतरही त्यांनी झाडे लावण्याचे काम सोडले नाही. आज त्यांचा उदरनिर्वाह निवृत्तीनंतरच्या पेन्शनमधूनच होतोय.
मला लहानपासूनच वृक्षाचं संगोपन करायला आवडत असल्याचे तुलसी गौडा यांनी सांगितले. तसेच आपण पर्यावरणाबाबत जागरुक असलो पाहिजे कारण झाडांना जगवणं आपली सर्वात मोठी जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे आता वृक्षाच्या संगोपनाची जबाबदारी त्यांचा नातू शेखरकडे दिले असल्याचे देखील तुलसी गौडा यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.