मुंबई - 'पद्मावत' सिनेमासंदर्भातील वाद संपुष्टात येण्याचं नावच घेत नाहीयत. 25 जानेवारीला हा सिनेमा देशभरात बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. सुप्रीम कोर्टानं सिनेमाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील दाखवलेला असतानाही गुजरात आणि राजस्थानमध्ये या अद्यापही तीव्र निदर्शनं सुरूच आहेत. अशातच सिनेमा पाहण्यापासून वंचित राहिले जाऊ नये, यासाठी सिनेचाहत्यांनी पद्मावत सिनेमाचं ऑनलाइन तिकीट बुक करण्यास सुरुवात केली आहे. एकूण चाहत्यांमध्ये सिनेमाबाबत प्रचंड उत्सुकता दिसून येत आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटकसहीत अन्य राज्यांमध्येही ऑनलाइन तिकीट बुकींग करण्यात येत आहे.
एकीकडे 'पद्मावत' सिनेमाला तीव्र विरोध जरी दर्शवण्यात येत असला तर दुसरीकडे चाहत्यांमध्ये सिनेमाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पद्मावत सिनेमाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर सिनेमासाठीच्या अॅडवान्स्ड बुकींगसाठी लिंक शेअर करण्यात आली आहे आणि चाहत्यांना सिनेमा रिलीजच्या एक दिवस आधीच पहिल्या दिवसाचा शो बुक करण्यासंबंधची माहिती पुरवण्यात आली आहे. पद्मावत सिनेमाबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. चाहते सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
दरम्यान, हा सिनेमा 1 डिसेंबर 2017मध्ये रिलीज होणार होता. मात्र सिनेमाविरोधात काही राज्यामध्ये प्रचंड निदर्शनं, आंदोलनं करण्यात आली. यामुळे सिनेमाच्या रिलीजची तारीख टाळण्यात आली. मात्र याविरोधात निर्मात्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतल्यानंतर चार राज्यांतील सिनेमावरील बंदीच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली.
पण अद्यापही गुजरात व राजस्थानमध्ये सिनेमाच्या प्रदर्शनाला विरोध करण्यात आला आहे. असं असलं तरीही चाहत्यांमध्ये सिनेमासाठी भलतीच क्रेझ पाहायला मिळत आहे. शहरांमध्ये सिनेमाच्या तिकिटांचं अॅडवान्स्ड बुकींग सुरू आहे. बुक माय शोवर सिनेमाच्या अॅडवान्स बुकींगसाठी अनेक मजेशीर व्हिडीओदेखील अपलोड करण्यात आले आहेत. हा सिनेमा 25 जानेवारीला मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे.