मुंबई - प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारच्यावतीने पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यंदा 7 दिग्गजांना पद्मविभूषण, 16 मान्यवरांना पद्मविभूषण आणि 118 जणांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यापैकी, पश्चिम बंगालमधील डॉ.सुशोवन बॅनर्जींचेही नाव आहे. 'एक रुपयावाला डॉक्टर' या नावाने ते परिचित आहेत. या डॉक्टरांनी आपल्या रुग्णांनाच हा पुरस्कार समर्पित केला आहे.
पश्चिम बंगालमध्ये यंदा 4 जणांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येत आहे. त्यामध्ये, गेल्या 57 वर्षांपासून रुग्णसेवा करणाऱ्या डॉ. सुशोवन बॅनर्जींचाही सन्मान होणार आहे. या पुरस्कारामुळे मी खूप आनंदी असून माझ्या रुग्णांमुळेच मला हा सन्मान मिळत आहे. त्यामुळे, मी हा पद्म पुरस्कार रुग्णांना समर्पित करतो, असे बॅनर्जी यांनी म्हटलंय.
पद्म पुरस्कार जाहीर झाल्यानंतर माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जीं यांनीही त्यांचे फोनवरुन अभिनंदन केल्याचं बॅनर्जी यांनी सांगितलं. विशेष म्हणजे, बीरभूम जिल्ह्यातील बोलपूर विधानसभा क्षेत्रातून ते सन 1984 साली काँग्रेसचेआमदार राहिले आहेत. त्यामुळे, पद्म पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केलंय. कारण, केंद्रातील भाजपा सरकारने एका काँग्रेसच्या माजी आमदाराला एवढा मोठा सन्मान दिला, असे ते म्हणाले. तसेच, मी केंद्र सरकारचा आभारी आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, बॅनर्जी यांच्याशिवाय पद्मश्रीसाठी पश्चिम बंगालमधील डॉ. अरुणोदय मंडल (वैद्यकीय), काजी मासूम अख्तर (साहित्य व कला) आणि मणीलाल नाग (कला) यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
दरम्यान, भारत सरकारने उल्लेखनीय आणि विधायक कार्याची दखल घेत सरकारने या पुरस्कारांची घोषणा केली. भारत सरकारच्या पद्मश्री पुरस्कारांच्या यादीत महाराष्ट्रातील हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार आणि बीजाबाई राहीबाई पोपेरे यांचाही समावेश आहे.