स्थलांतरीत मजुरांच्या वेदना असहाय्य, राजघाटावर एकाच कार्यकर्त्यांच आमरण उपोषण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 09:23 PM2020-05-11T21:23:07+5:302020-05-11T21:27:55+5:30
मुंबई, पुणे, दिल्ली येथून मोठ्या संख्येने मजूर उत्तर प्रदेश आणि बिहार येथे जात आहेत. लॉकडाऊनमुळे ट्रान्सपोर्ट सेवा बंद असल्याने हे मजूर गावी जाण्यासाठी पायपीठ करत आहेत
नवी दिल्ली - लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे विविध राज्यातील आणि जिल्ह्यातील मजूर, कामगार, विद्यार्थी आणि पर्यटक अनेक ठिकाणी अडकून पडले आहेत. केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने शिथिलता दिल्यानंतर या सर्वच नागरिकांना त्यांच्या गावी पोहोचविण्यात येत आहे. त्यासाठी, रेल्वे, बस आणि खासगी वाहनांने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. परराज्यातील मजूरांना स्पेशल श्रमिक ट्रेनच्या सहाय्याने राज्य सरकारने त्यांच्या राज्यात पाठविण्यात सुरुवात केली आहे. मात्र, अद्यापही हजारो मजूर पायीच आपल्या गावाकडं जाताना दिसत आहेत. या मजूरांच्या वेदना दूर व्हाव्यात म्हणून एक तरुण कार्यकर्ता थेट राजघाटावर आंदोलन करत बसला होता.
मुंबई, पुणे, दिल्ली येथून मोठ्या संख्येने मजूर उत्तर प्रदेश आणि बिहार येथे जात आहेत. लॉकडाऊनमुळे ट्रान्सपोर्ट सेवा बंद असल्याने हे मजूर गावी जाण्यासाठी पायपीठ करत आहेत. यातून अपघाताच्या घटना घडताना दिसत आहेत. औरंगाबाद येथे झालेल्या रेल्वे दुर्घटनेत १५ मजूरांचा मृत्यू झाला. या घटनेनं देशातील मजूरांच्या स्थलांतराचे भीषण वास्तव जगासमोर आले आहे. त्यानंतर, सर्वच राज्यातील नेत्यांकडून मजूरांना चालत न जाण्याची विनंती करण्यात येत आहे. मजुरांनी दिल्ली सोडून जाऊ नये, अशी मी त्यांना विनंती करतो. जर तुम्ही अडकले आहात आणि तुमची घरी जाण्याची इच्छा आहे, तर आम्ही ट्रेनची व्यवस्था करीत आहोत. बिहार, मध्य प्रदेशला रेल्वेगाड्या गेल्या आहेत. अजून थोडावेळ वाट पाहा, पण पायी चालत जाऊ नका.", असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले. मात्र, मजूरांची पायपीट काही केल्या बंद होताना दिसत नाही.
या मजूरांच्या अडचणींवर सरकारने उपाय करावा म्हणून, सामाजिक कार्यकर्ता प्रवीण काशी यांनी दिल्लीतील राजघाट येथे महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर आमरण उपोषण सुरु केलं आहे. आपल्या उपोषणात या कार्यकर्त्याने तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत. स्थलांतरीत मजूर आणि नागरिकांना मास्क, सॅनिटायझर्स आणि कोरोनाविरुद्ध लढण्यासाठीच्या महत्वाच्या वस्तू देण्यात याव्यात. तसेच, स्वस्त धान्य दुकानातून धान्य आणि जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करावा. त्यासोबतच, तिसरी मागणी म्हणजे, देशातील प्रत्येक बेरोजगारास प्रतिदिन २५० रुपये एवढा भत्ता देण्यात यावा, अशी मागणी या सामाजिक कार्यकर्त्याने केली आहे.
दिल्लीतील यमुना ब्रीजजवळ शेकडो मजूर आणि स्थलांतरीत अडकून पडले आहेत. या सर्वांना आपल्या घरी जायचं आहे, मी या मजूरांना भेटलो असून त्यांच पीडा असहनीय असल्याचे काशी यांनी म्हटलं आहे. या मजूरांचे भविष्य अंधकारमय बनल आहे, त्याची सर्वांनाची भीती वाटत असल्याचं त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. या कामगारांना पोटाला अन्न मिळत नसल्याने आणि हाती काम नसल्याने पैसा नाही, म्हणूनच हे आपल्या मूळगावी जात असल्याचं काशी यांनी सांगितलं. देशात लाखो मजूर, कामगार स्थलांतर करताना दिसत आहेत. आपल्या लहान मुलांसह भुकेल्या पोटाने हे मजूर मैल न मैल चालत आहेत. सरकारपर्यंत या कामगारांचा आवाज का पोहोचत नाही? असा सवालही काशी यांनी विचारला आहे.
काशी यांच्या आंदोलनाची माहिती मिळताच, दर्यागंज पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी राजघाटवर जाऊन काशीला ताब्यात घेतलं आहे. तसेच, तुम्हाला उपोषण करता येणार नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. मात्र, तरीही मी मजूरांच्या प्रश्नासाठी संघर्ष करतच राहणार, असे काशीने म्हटले आहे.