नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी बॉम्बफेक करून नष्ट केलेले बालाकोट येथील दहशतवादी तळ पुन्हा सुरू करण्याचा पाकिस्तान प्रयत्न करीत आहे. तशी माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाल्याचे केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी बुधवारी राज्यसभेत दिली. देशाच्या सीमा सुरक्षित राखण्यासाठी केंद्र सरकार योग्य पावले उचलेल, असेही ते म्हणाले.त्यांनी सांगितले की, बालाकोटमधील दहशतवादी तळ पुन्हा सुरू करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. तिथे दहशतवादी, तसेच जिहादी प्रशिक्षण देण्यासाठी तयारी केली जात आहे. काश्मीरमधील पुलवामामध्ये १४ फेब्रुवारी रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते.या घातपाती कृत्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या विमानांनी पाकिस्तानमधील बालाकोटवर हल्ले चढवून तेथील दहशतवादी तळ नष्ट केले.किशन रेड्डी यांनी सांगितले की, कोणत्याही परिस्थितीत दहशतवाद सहन केला जाणार नाही अशी केंद्र सरकारची भूमिका आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी सुरक्षा दले सज्ज आहेत. गेल्या काही वर्षांत सुरक्षा दलांनी काश्मीरमधील अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.दहशतवादाच्या ५९४ घटनायंदाच्या वर्षी १७ नोव्हेंबरपर्यंत काश्मीरमध्ये दहशतवादाच्या ५९४ घटना घडल्या. त्यात ३७ नागरिक ठार व ७९ जवान शहीद झाले.२०१८ साली काश्मीरमध्ये दहशतवादाचे ६१४ प्रकार घडले होते. त्यात ३९ नागरिक ठार व ९१ सुरक्षा जवान शहीद झाले होते. यंदाच्या वर्षी आॅक्टोबर महिन्यापर्यंत काश्मीरमध्ये १७१ घुसखोरीचे प्रकार घडले.२०१८ साली ३२८ घुसखोरीच्या घटना घडल्या होत्या.काश्मीरमधील दहशतवादी कारवाया जवळपास संपुष्टात : राजनाथसिंहनवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवाया जवळपास संपुष्टात आल्या आहेत असा दावा केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी बुधवारी लोकसभेत केला. लष्कर, निमलष्करी दल, जम्मू-काश्मीर पोलीस पररस्परांत उत्तम समन्वय साधून दहशतवादाचा मुकाबला करीत आहेत, असेही ते म्हणाले.राजनाथसिंह म्हणाले की, गेल्या ३०-३५ वर्षांपासून काश्मीरमध्ये दहशतवादाने उच्छाद मांडला होता. मात्र, त्या केंद्रशासित प्रदेशात सुरक्षा दलांनी आता उत्तम कामगिरी केली आहे. तिथे दहशतवादी कारवायांचे प्रमाण नसल्यातच जमा आहे.काश्मीरमध्ये महिनाभरापूर्वी दहशतवाद्यांनी पश्चिम बंगालमधून आलेले पाच मजूर व अन्य राज्यांतील दोन ट्रकचालकांना ठार केले होते. त्याबद्दल काँग्रेसचे खासदार के. सुरेश यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते.काश्मीरमध्ये परिस्थिती सुरळीत असल्याचे सांगून केंद्र सरकार जनतेची दिशाभूल करीत आहे असा आरोप के. सुरेश यांनी केला.राजनाथसिंह यांनी सांगितले की, काश्मीर वगळता देशातील अन्य भागांमध्ये गेल्या साडेपाच वर्षांत दहशतवाद्यांनी मोठ्या प्रमाणावर हिंसाचार केलेला नाही. मात्र, संरक्षणमंत्र्यांच्या उत्तराने समाधान न झालेल्या विरोधी पक्ष सदस्यांनी मागणी केली की, काश्मीरमध्ये लवकरात लवकर परिस्थिती सुरळीत व्हायलाच हवी.इंटरनेट सेवा अनिश्चितजम्मू-काश्मीरमध्ये बंद केलेली इंटरनेट सेवा कधी सुरू करणार याबद्दल कोणताही शब्द देणे केंद्र सरकारने टाळले. ग्रामीण भागातील ब्रॉडबँड व इंटरनेट सेवेच्या स्थितीबाबत लोकसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासात चर्चा सुरू होती.त्यावेळी नॅशनल कॉन्फरन्सचे खासदार हस्नैन मसुदी यांनी सवाल केला की, गेल्या चार महिन्यांपासून काश्मीर खोऱ्यातील इंटरनेट सेवा बंद असून, ती कधी सुरू करणार? याला उत्तर देताना केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती-तंत्रज्ञान खात्याचे राज्यमंत्री संजय धोत्रे म्हणाले की, सुरक्षेच्या कारणास्तव काश्मीरमध्ये काही निर्बंध लागू केले आहेत.तेथील परिस्थितीत आता खूप सुधारणा झाली आहे. मात्र, काश्मीरमधील इंटरनेट सेवा कधी सुरू करणार याचा उल्लेख धोत्रे यांनी आपल्या उत्तरात केला नाही. पाच आॅगस्ट रोजी ३७० कलम रद्द केल्यापासून काश्मीरमधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.