नवी दिल्ली- भारतानं बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानची लढाऊ विमानं वारंवार भारतीय नियंत्रण रेषेवर घिरट्या घालत आहेत. भारतीय हवाई दलानंपाकिस्तानमधले दहशतवादी कॅम्प नष्ट केल्यानंतर पाकिस्तानची लढाऊ विमानं भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु आतापर्यंत भारतानं पाकिस्तानच्या सर्वच नापाक योजना हाणून पाडल्या आहेत.सोमवारीही पाकिस्तानचे एफ 16 हे लढाऊ विमान पंजाब सीमेजवळ घिरट्या घालत असताना दिसलं. एएनआयच्या माहितीनुसार, पंजाब सीमेजवळ भारतीय रडारनं चार पाकिस्तानी एफ 16 विमानं आणि एक मोठ्या आकाराच्या यूएव्हीला पकडलं. त्यानंतर भारतीय हवाई दलाच्या सुखोई आणि मिराज या विमानांनी उड्डाण घेतलं. भारतीय लढाऊ विमानं येत असल्याचं पाहताच पाकिस्तानची लढाऊ विमानं पाकच्या हद्दीत परतली. ही घटना एक एप्रिलला पहाटे 3 वाजता घडली. पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे कॅम्प उद्ध्वस्त केले होते. 26 फेब्रुवारीला भारताच्या मिराज या लढाऊ विमानांनी पाकिस्तानमध्ये घुसून बालाकोटमधील दहशतवादी तळ नेस्तनाबूत केले होते. त्यानंतर 27 फेब्रुवारीला सकाळी पाकिस्ताननं एफ 16 आणि जेएफ 17 ही लढाऊ विमानं भारताच्या हद्दीत घुसवण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान भारताच्या मिग 21 या लढाऊ विमानानं पाकिस्तानच्या एफ 16 या लढाऊ विमानाला खाली पाडलं. त्यानंतर मिग 21 विमानही दुर्घटनाग्रस्त झालं. भारतीय वैमानिक अभिनंदन वर्धमानलाही पाकिस्ताननं आपल्या ताब्यात घेतलं होतं. परंतु भारतानं दबाव वाढल्यानंतर त्याला पाकिस्ताननं सोडलं होतं.
भारताच्या सीमेवर पाकचं F16 लढाऊ विमान, सुखोई अन् मिराजनं लावलं पळवून
By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2019 9:31 PM