श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर गेल्या काही दिवसांपासून कुरापती पाकिस्तानकडून वारंवार हल्ला करण्यात येत आहे. यामुळे सीमारेषेवर तणाव निर्माण झाला आहे. मंगळवारी (22 मे) रात्रीदेखील पाकिस्ताननं कथुआ जिल्ह्यातील आरएसपुरा सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्ताननं बीएसएफच्या जवळपास 40 चौक्यांवर निशाणा साधला. पाकिस्तानच्या या हल्ल्याला भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले.
दरम्यान, पाकिस्तानच्या गोळीबारात एका नागरिकाचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये हीरानगर सेक्टरमधील लोंदी गाव व अरनिया सेक्टरमधील नागरिकांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून रात्री उशिरापर्यंत हीरानगर, सांबा, रामगड, अरनिया आणि आरएसपुरा सेक्टरमध्ये गोळीबार सुरू होता. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कुरापती पाकिस्तानकडून वारंवार सुरू असलेल्या गोळीबार आणि तोफगोळ्यांच्या माऱ्यामुळे आंतरराष्ट्रीय सीमारेषेपासून पाच किलोमीटर परिसरातील सर्व सरकारी तसंच खासगी शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.