नवी दिल्ली- पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना पत्र लिहिलं आहे. एलओसी आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचा भारतावर आरोप करत ते थांबविण्याची मागणी केली आहे. गेल्या आठवड्यात सुषमा स्वराज यांना हे पत्र मिळालं आहे.
दोन्ही देशांकडून होणारं शस्त्रसंधीचं उल्लंघन बंद करण्याची आता वेळ आली आहे. कारण यामध्ये निर्दोष लोकांचा बळी जातो, असं ख्वाजा आसिफ यांनी पत्रात म्हंटलं आहे. भारतीय जवाल सुरूवातीला गोळीबार करून उकसविण्याचा प्रयत्न करतात. त्या गोळीबाराला पाकिस्तानकडून उत्तर दिलं जातं, असाही आरोपही ख्वाजा आसिफ यांनी पत्रातून केला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी अजून या पत्राचं पाकिस्तानला कुठलंही उत्तर दिलेलं नाही. मंत्रालयातील सुत्रांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांकडून करण्यात आलेला हा आरोप स्विकारण्याजोगा अजिबात नाही. 2017मधील सरकारी आकडेवारीनुसार पाकिस्तानी सैन्याकडून होणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनात वाढ झाली आहे.
गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, यावर्षी ऑक्टोबरपर्यंत पाकिस्ताने इंटरनॅशनल बॉर्डर आणि एलओसीवर 724 वेळी शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. गेल्यावर्षी हा आकडा 449 होता. ऑक्टोबरपर्यंत पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात 12 नागरिक आणि 17 भारतीय जवानांचा मृत्यू झाला.
हेरगिरीचा आरोप असलेले कुलभूषण जाधव पाकिस्तानच्या तुरूगांत आहेत. कुलभूषण जाधव यांची पत्नी त्यांना भेटण्यासाठी पाकिस्तानात जाणार आहे. त्यांच्या सुरक्षेची पूर्ण खात्री पाकिस्तानने द्यावी, अशी भारताची मागणी आहे. पाकिस्तानकडून नुकतीच कुलभूषण जाधव यांच्या पत्नीला त्यांना भेटण्याची परवानगी दिली आहे. पण जाधव यांच्या आईलाही त्यांना भेटण्याची परवानगी मिळावी,अशी भारताची इच्छा आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी या पत्रात जाधव प्रकरणाचा उल्लेख केला नसल्याचं सुत्रांकडून समजतं आहे.
गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानकडून इस्लामाबादमधील भारतीय दूतावासाला समन्स दिला जातो आहे. भारताकडून होणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनामुळे क्षेत्रीय शांती आणि सुरक्षेचं नुकसान होऊ शकतं, असं पाकिस्तानचं म्हणणं आहे. सुषमा स्वराज यांना पाठविलेल्या पत्रात आसिफ यांनी उलट भारतावरच शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्याचा आरोप केला आहे. भारतीय जवानांनी यावर्षी 1300 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं ज्यामध्ये 52 नागरिकांचा मृत्यू झाला, असा आरोप पाकिस्तानने केला आहे.