तब्बल 250 दहशतवादी भारतीय हद्दीत घुसण्याच्या तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 12:51 PM2018-09-27T12:51:22+5:302018-09-27T12:57:01+5:30
सर्जिकल स्ट्राईकमध्ये उद्ध्वस्त केलेल्या लॉन्चिंग पॅड्सची पुन्हा उभारणी
नवी दिल्ली: एकीकडे पंतप्रधान इम्रान खान भारताकडे मैत्रीचा हात पुढे करत असताना दुसरीकडे पाकिस्तानी सैन्याकडून भारतात दहशतवादी घुसवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 250 दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करता यावी, यासाठी पाकिस्तानी लष्कराचे प्रयत्न सुरू आहेत. गुप्तचर विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर 27 लॉन्च पॅड उभारण्यात आले आहेत. यामधून दहशतवादी भारतात घुसू शकतात. धक्कादायक बाब म्हणजे, यातील आठ कॅम्प गेल्या महिन्याभरात उभारले गेले आहेत.
पाकिस्तानी लष्कराचा आशीर्वाद असलेल्या दहशतवाद्यांनी लिपा भागात कॅम्पची उभारणी केली आहे. या भागातील कॅम्प भारतीय सैन्यानं दोन वर्षांपूर्वी सर्जिकल स्ट्राईक करुन उद्ध्वस्त केला होता. भारतीय जवानांनी सर्जिकल स्ट्राईकच्या कारवाईवेळी भिंबर गली परिसरातील लॉन्चिंग पॅड्सदेखील उद्ध्वस्त केले होते. मात्र सध्या तरी या भागात दहशतवाद्यांनी लॉन्चिंग पॅड्स उभारलेले नाहीत. भारतीय सैन्यानं केलेल्या सर्जिकल स्ट्राईकला दोन दिवसांनी दोन वर्ष पूर्ण होणार आहेत.
इम्रान खान पंतप्रधान झाल्यापासून जवळपास 250 दहशतवादी लॉन्चिंग पॅड्सवर डेरेदाखल झाले आहेत. यातील बहुतांश दहशतवादी हे लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीनचे आहेत. गेल्या महिन्याभरात लिपा, चकोठी, बरारकोट, शार्डी, जुरा भागात दहशतवाद्यांनी लॉन्चिंग पॅड्स उभारले आहेत. याशिवाय चनानिया, मंदौकली आणि नौकोटमध्येही लष्कर-ए-तोयबानं कॅम्प उभारले आहेत. याठिकाणी 30 दहशतवादी आहेत.