पाकिस्तानचे हायटेक कारस्थान, ड्रोणद्वारे भारतात करताहेत ड्रग्जची तस्करी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2018 05:46 PM2018-06-06T17:46:37+5:302018-06-06T17:46:37+5:30
पाकिस्तानकडून सीमावर्ती राज्यांमध्ये होणारी अमली पदार्थांची तस्करी ही भारतासाठी नेहमीची डोकेदुखी ठरत आहे. त्यात सुरक्षा दलांची नजर चुकवून भारतात अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी पाकिस्तानने हायटेक कारस्थान रचले आहे.
चंदिगड - पाकिस्तानकडून सीमावर्ती राज्यांमध्ये होणारी अमली पदार्थांची तस्करी ही भारतासाठी नेहमीची डोकेदुखी ठरत आहे. त्यात सुरक्षा दलांची नजर चुकवून भारतात अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी पाकिस्तानने हायटेक कारस्थान रचले आहे. त्यानुसार पंजाबसारख्या पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या राज्यांमध्ये पाकिस्तानकडून ड्रोणच्या मदतीने हेरॉइनसारख्या अमली पदार्थांची तस्करी करण्यात येत आहे. पंजाबमधील सीमेजवळच्या गावांमध्ये असे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत.
बीएसएफच्या गुप्तहेर विभागामधील सूत्रांनी पाकिस्तानकडून अशा प्रकारे तस्करी होत असल्याच्या माहितीस दुजोरा दिला आहे. गुरुदासपूरमधील सीमेला लागून असलेल्या गावामध्ये काही दिवसांपूर्वी असा प्रकार समोर आला होता. त्यावेळी प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळलेले अमली पदार्थ घेऊन जमिनीपासून 200 मीटरपर्यंत उंच उडू शकणारे एक ड्रोण भारताच्या हद्दीत घुसले. मात्र सुरक्षा दलांच्या नजरेस पडताच हे ड्रोण अमली पदार्थ न टाकताच पाकिस्तानच्या हद्दीत पसार झाले. मात्र या घटनेमुळे पाकिस्तानकडून हायटेक पद्धतीने होत असलेली अमली पदार्थांची तस्करी बीएसएफच्या नजरेत आली आहे. अशाच प्रकारचे एक ड्रोण सीमावर्ती भागात असलेल्या सहारन येथेही दिसून आले होते.
हल्लीच्या काळात तस्करीसाठी वापरण्यात आलेला हा नवा पर्याय असल्याचे बीएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. याआधी सराईत स्कूबा डायव्हर्सच्या मदतीने सतलज आणि रावी नदीमधून पाकिस्तान भारतात अमली पदार्थांची तस्करी करत असे.
पाकिस्तानची 553 किमी सीमा पंजाबला लागून आहे. या सीमेवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी बीएसएफकडे आहे. दरम्यान गुप्तहेर विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानमधून पंजाबमधील अबोहर, फिरोझपूर, अमृतसर आणि गुरुदासपूर जिल्ह्यांमध्ये हेरॉइनची तस्करी होते. 2017 साली बीएएफने 270 किलो हेरॉइन आणि अन्य अमली पदार्थ जप्त केले होते.