श्रीनगर : सीमारेषेवरील पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढताहेत. रविवारी (20 मे) अंदाधुंद गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानच्या सैन्याला भारताच्या सीमा सुरक्षा दलानं (बीएसएफ) सडेतोड प्रत्युत्तर देताच, पूर्णतः घाबरुन गेलेल्या पाकिस्ताननं हल्ले थांबवण्याची गयावया केली होती. मात्र यानंतर काही वेळातच पाकिस्ताननं आपला नापाक चेहरा दाखवत आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर पुन्हा अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली.
रविवारी (20 मे)रात्रीपासून आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात येत आहे. जम्मू काश्मीरमधील अरनिया सेक्टर परिसरात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परिसरात सध्या गोळीबार सुरू असून बीएसएफ आणि स्थानिक पोलिसांनी ग्रामस्थांना घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. शिवाय, परिसरातील शाळादेखील बंद ठेवण्यात आल्या आहेत.
अरनिया क्षेत्रातील त्रेवा गावाला पाकिस्तानकडून लक्ष्य करण्यात आले आहे. गेल्या तीन दिवस जम्मू काश्मीरच्या आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या भारतीय नागरी वस्त्यांत शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन अंदाधुंद गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याला भारताच्या सीमा सुरक्षा दलानं जोरदार हल्ल्यानं उत्तर देताच पाकिस्तान पार घाबरुन गेला आणि आमच्यावरील हल्ले थांबवा, अशी गयवया पाकिस्तानी रेंजर्सनं रविवारी सकाळी केली. यानंतर बीएसएफनं सीमारेषेवर गोळीबार बंद केल्यानंतर 10.10 वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार सुरू करण्यात आला.
जम्मूतील सांबा सेक्टर परिसरातील बाबा चमिलियाल आणि नारायणपुरा परिसरात आंतरराष्ट्रीय सीमारेषेजवळ पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले. सध्या परिसरात पाकिस्तानकडून तोफगोळ्यांचा मारा करण्यात येत असल्याचे वृत्त समोर आले असून भारतीय जवानदेखील त्यांच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत आहेत.
गोळीबार थांबवा, पाकिस्तानची गयावया !
पाकिस्ताननं तीन दिवस चालवलेल्या गोळीबार व तोफगोळ्यांच्या माऱ्यामुळे सीमा भागातील काही भारतीय रहिवासी मरण पावले असून, अनेक जण जखमी झालेत. बीएसएफचे दोन जवानही शहीद झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (19 मे) काश्मीरच्या लेह येथे आलेले असतानाही पाकिस्तानच्या कागळ्या सुरूच होत्या. यानंतर बीएसएफ जवानांनी आक्रमक पवित्रा घेऊन पाकिस्तानला धडाच शिकवला.
बीएसएफच्या जवानांनी केलेल्या प्रतिहल्ल्यात पाकिस्तानच्या झालेल्या नुकसानाची माहिती देणारी 19 सेकंद कालावधीची थर्मल इमेजरी फित जारी करण्यात आली आहे. यावर्षी पाकिस्तानकडून 700 हल्ले चढवण्यात आले असून त्यात 18 जवान शहीद झालेत तर 20 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.