राजौरी : नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानच्या सैनिकांकडून गोळीबार करण्यात आला.
बुधवारी नियंत्रण रेषेजवळील नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या सैन्याकडून बुधवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात नौशेरा येथील 55 वर्षीय नागरिक गंभीर जखमी झाला. मात्र, या नागरिकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबाराला भारतीय लष्कराच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. तसेच, नियंत्रण रेषेजवळील परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, पाकिस्तानकडून सतत होत असलेल्या गोळीबारामुळे खबरदारीचा उपाय म्हणून येथील जिल्हा प्रशासनाने या भागातील शाळा बंद करण्याचा आदेश दोन दिवसांपूर्वी दिला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने प्रशासनाने नियंत्रण रेषेपासून जवळपास पाच किलोमीटरच्या परिसरात असणाऱ्या सर्व शाळा बंद करण्याचा आदेश दिला आहे. तसेच, या गोळीबारामुळे कोणतीही जीवितहानी झाली असल्याचे अद्याप वृत्त नाही. या गोळीबारामुळे नियंत्रण रेषेजवळील भागात राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.