जम्मू-काश्मीर- भारतानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकनंतर पाकिस्ताननं मोठ्या प्रमाणात शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. पाकिस्ताननं आतापर्यंत अखनूर, नौशेरा आणि पुंछ सेक्टरमध्ये जोरदार गोळीबाराला सुरुवात केली आहे. भारतीय जवानही पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत आहे. भारतानं नियंत्रण रेषेजवळच्या गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा दिला असून, त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवलं जात आहे. पाकिस्तानचा अखनूर, नौशेरासह पुंछ आणि राजोरीतल्या मिळून जवळपास सात विविध सेक्टरमध्ये जोरदार गोळीबार सुरू आहे. भारतीय हवाई दलानंपाकिस्तानच्या हद्दीत घुसून 300 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. रात्री तीन ते साडेतीनच्या दरम्यान भारतीय हवाई दलानं जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर हल्ला चढवला. हवाई दलाच्या 12 मिराज 2000 विमानांनी मध्यरात्री नियंत्रण रेषा ओलांडून दहशतवादी तळांवर हल्ले केले. बालाकोट, मुझफ्फराबाद आणि चकोठी भागात हवाई दलानं 1000 किलोंचे बॉम्ब फेकले. भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी तळांवर एअर सर्जिकल स्ट्राईक केला आहे.या हल्ल्यात पाकिस्तानच्या बालाकोट येथील बहुतांशी दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. मिराज फायटर जेटच्या सहाय्याने हा हल्ला करण्यात आला आहे. पाकिस्तानचे मेजर जनरल गुफूर यांनी भारतीय हवाई दलाच्या विमानांनी पाकिस्तानच्या हवाई हद्दीत घुसखोरी केल्याचा आरोप केला आहे. तसेच पाकिस्तानी विमानांनी भारताच्या विमानांना पळवून लावल्याचा दावाही केला आहे. भारतीय हवाई दलाच्या मिराज 2000’ची 12 लढाऊ विमानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील 'जैश-ए-मोहम्मद'च्या दहशतवादी तळांवर हल्ले करत होती. त्यावेळी मोदी साऊथ ब्लॉकमध्ये होते आणि कंट्रोल रुममधून त्यांचं पूर्ण मोहिमेवर लक्ष होतं. बालाकोटमध्ये जवळपास 3.45 वाजता, मुजफ्फराबादमध्ये 3.48 वाजता, तर चाकोटीमध्ये 3.58मध्ये प्रशिक्षण शिबिरांवर हल्ला केला आहे.
पाककडून सात ठिकाणी शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारतीय जवानांचंही चोख प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2019 7:02 PM