पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, नागरी वस्त्यांमध्ये हल्ले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 02:23 AM2017-07-20T02:23:44+5:302017-07-20T02:23:44+5:30
पाकिस्तानने शस्त्रसंधीचे बुधवारी पुन्हा उल्लंघन करून पूंछ-राजौरी पट्ट्यातील अनेक खेडी आणि भारतीय ठाण्यांवर उखळी बाँम्बच्या केलेल्या माऱ्यात नागरिक जखमी झाला.
जम्मू : पाकिस्तानने शस्त्रसंधीचे बुधवारी पुन्हा उल्लंघन करून पूंछ-राजौरी पट्ट्यातील अनेक खेडी आणि भारतीय ठाण्यांवर उखळी बाँम्बच्या केलेल्या माऱ्यात नागरिक जखमी झाला. या बॉम्बच्या माऱ्याला भारताच्या लष्कराने तोडीस तोड उत्तर दिले. पाकिस्तानने या भागांत गोळीबारही केला.
भिंबेर गली सेक्टरमधील नौशेरा सेक्टरमध्ये असलेल्या भारतीय लष्कराच्या ठाण्यांवर पाकिस्तानने सकाळी ८.४५ वाजता अकारण गोळीबार केला. त्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानच्या लष्कराने राजौरी आणि पूंछ जिल्ह्यातील बालाकोट, धार, लांबिबरी, राजधानी, मानकोट, संदोट येथे बुधवारी सकाळी उखळी तोफांचा मारा सुरू केला. त्यात नियंत्रण रेषेवरील संदोट या छोट्या खेड्यातील रझा नावाचा रहिवासी जखमी झाला.
पाकिस्तानने मंगळवारी
पाच वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन
करून अनेक खेडी व लष्कराच्या ठाण्यांवर उखळी बॉम्बचा मारा
केला होता. त्यात दोन जवान
हुतात्मा झाले आणि सहा जण
जखमी झाले.
विद्यार्थ्यांना फटका
राजौरी जिल्ह्यात शेकडो शाळकरी विद्यार्थ्यांचे जीवित पाकच्या तोफमाऱ्यांमुळे संकटात सापडले आहे. काल शाळेतील २१७ विद्यार्थ्यांना सुरक्षा दलाच्या जवानांनी सुरक्षित बाहेर काढले होते. तोफमाऱ्याचा पाच हजार विद्यार्थ्यांना फटका बसला आहे.