नवी दिल्ली - वाराणसी कारागृहातून एका पाकिस्तानी कैद्याची तब्बल 16 वर्षांनंतर रविवारी (4 नोव्हेंबर) सुटका करण्यात आली. मात्र या कैद्याने भारतातून जाताना एक अशी आठवण सोबत नेली आहे. जी समजल्यावर नक्कीच आश्चर्य वाटेल. जलालुद्दीन असं या पाकिस्तानी कैद्याचं नाव असून त्याने 'श्रीमद्भगवद्गीता' आपल्यासोबत नेली आहे. 'एएनाय' या वृत्तसंस्थेने याबाबतच वृत्त दिले आहे.
जलालुद्दीन हा पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील आहे. त्याला अटक करण्यात आल्यानंतर 16 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. जलालुद्दीनला अटक करण्यात आली तेव्हा त्याचं माध्यमिक शिक्षण पूर्ण झालं होतं. जलालुद्दीनने अभ्यासासोबतच श्रीमद्भगवद्गीतेचे अध्ययन केले. गीतेमुळे त्याचे मनपरिवर्तन झाले. पाकिस्तानला परत जात असताना त्याने आपल्यासोबत एक चांगली आठवण म्हणून श्रीमदभगवद्गीतेची एक प्रत नेली आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ अर्थात इग्नू (IGNOU) येथून त्याने कला क्षेत्रातील पदवीपर्यंतचं (एमए) शिक्षण घेतलं. तसेच कारागृहात त्याने इलेक्ट्रीशियनचा कोर्स पूर्ण केला असल्याची माहिती गौड यांनी दिली.