नवी दिल्ली: पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी पाकिस्ताननं नवा दावा केला. पाकिस्तानच्या हद्दीत घुसण्याच्या तयारीत असलेल्या भारतीय पाणबुडीला हुसकावून लावल्याचा दावा पाकिस्तानी नौदलानं केला. त्यासाठी त्यांनी एक चित्रफितदेखील दाखवली. भारतीय पाणबुडी घुसखोरीच्या प्रयत्नात होत असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र या दाव्यात काहीच तथ्य नसल्याचं संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितलं. भारतीय पाणबुडी पाकिस्तानच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत होती, यात तथ्य नसल्याचं भारतीय संरक्षण तज्ज्ञांनी म्हटलं. 'पाकिस्ताननं ज्या ठिकाणी हा प्रकार घडला, त्या ठिकाणचा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. मात्र त्यात तथ्य दिसत नाही. ज्या क्षेत्राला पाकिस्तान स्वत:चं सागरी क्षेत्र म्हणून घेतो आहे, तो भाग पाकिस्तानच्या सागरी हद्दीत येत नाही. तो भाग आंतरराष्ट्रीय सीमेच्या अंतर्गत येतो. त्यामुळे त्या भागात भारतीय पाणबुडीला अटकाव करण्याचा प्रश्नच येत नाही. कारण पाकिस्तानला तो अधिकारच नाही,' असं संरक्षण तज्ज्ञांनी म्हटलं. पाकिस्ताननं प्रसिद्ध केलेली चित्रफित चार मार्चची आहे. यामध्ये रात्री 8.35 ची वेळ दिसत आहे. पाकिस्तानी नौदलानं भारतीय पाणबुडीला मागे हटवण्यासाठी विशेष कौशल्याचा वापर केल्याचा दावा नौदलाच्या प्रवक्त्यानं केला. 'पाकिस्तानी नौदलानं भारतीय पाणबुडीची घुसखोरी रोखली. पाकिस्तानचं धोरण शांततेचं असल्यानं पाणबुडीला लक्ष्य करण्यात आलं नाही,' असं म्हणत नौदल प्रवक्त्यानं सौहार्दाचा राग आळवला. पाणबुडीला रोखल्याचा दावा करणाऱ्या पाकिस्ताननं भारताला थेट धमकीदेखील दिली. 'भारतानं या घटनेपासून धडा घ्यायला हवा. पाकिस्तानी नौदल आपल्या जलक्षेत्राचं संरक्षण करण्यासाठी तत्पर आहे. कोणत्याही आक्रमक कारवाईला पूर्ण ताकदनिशी उत्तर देण्यास आम्ही समर्थ आहोत,' असं पाकिस्तानी नौदलाचे प्रवक्ते म्हणाले. 2016 नंतर दुसऱ्यांदा अशा प्रकारची घटना घडल्याचा दावादेखील त्यांनी केला.
पाणबुडीवरूनही पाकिस्तानची घागर बुडाली; खोटं बोलून अब्रू घालवली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2019 4:05 PM