काश्मीरच्या निर्णयावर पाक वृत्तपत्रांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 04:20 AM2019-08-07T04:20:16+5:302019-08-07T04:20:34+5:30
भारत सरकारने घेतलेल्या निर्णयाचे तीव्र पडसाद पाकिस्तानातील प्रसिद्धी माध्यमांमध्ये उमटले
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरबाबत भारत सरकारने सोमवारी घेतलेल्या निर्णयाचे तीव्र पडसाद पाकिस्तानातील प्रसिद्धी माध्यमांमध्ये उमटले असून, तेथील सर्वच वृत्तपत्रांनी या निमित्ताने मंगळवारी भारतावर टीका केली आहे. भारताने जबरदस्तीने आणि हुकूमशाही काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतला आणि एक विशिष्ट समाज नष्ट करण्याचा भारत सरकारचा प्रयत्न आहे, असे काही वर्तमानपत्रांनी म्हटले आहे.
‘डॉन’ या मोठ्या खपाच्या प्रमुख दैनिकाने भारत सरकार हिंदुत्तवादी विचारांचे असल्याचे म्हटले आहे. काश्मीरमध्ये हिंदूंची संख्या वाढवण्यासाठी काश्मीरबाबतची ३७0 व ३५ अ ही कलमे हटवण्यात आल्याची टीकाही त्यात करण्यात आली आहे. मोदी सरकारच्या या निर्णयांना काँग्रेस व डाव्या पक्षांचा विरोध आहे, असे नमूद करताना डाव्या पक्षांतर्फे करण्यात आलेल्या आंदोलनाला डॉनने प्रसिद्धी दिली आहे.
इस्राएलने ज्या प्रकारे एक विशिष्ट समुदाय देशातून संपविण्याचे कारस्थान आखले होते, तसेच भारत सरकारने काश्मीरबाबत चालविले असल्याची टीका ‘द नेशन’ वृत्तपत्राने केली आहे. काश्मीरचा जगाशी असलेला संपर्क तोडण्याचे प्रयत्न भारत सरकार करू पाहत असून, नियंत्रण रेषेवर प्रचंड तणाव निर्माण करण्याचा आणि त्यात पाकिस्तानला अडकावण्याचा भारताचा प्रयत्न आहे, असे म्हटले आहे.
भारत सरकारने हा निर्णय घेताना काश्मीरमधील ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती या नेत्यांना डांबून ठेवले, संपूर्ण काश्मीर खोऱ्यात लष्कर व सशस्त्र दले आणून संचारबंदीसदृश्य वातावरण निर्माण केले, लोकांत भीती निर्माण केली, असे द न्यूज या वेबसाइटच्या वृत्तात म्हटले आहे. भारताचा हा निर्णय संयुक्त राष्ट्रांच्या धोरणाविरुद्ध असल्याचे शरीफ यांनी म्हटले आहे. भारतात सध्या अतिटोकाचे सरकार असून, त्याचे इरादे काय आहेत, हे उघड झाले आहे, अशी प्रतिक्रिया बिलावल भूट्टो यांनी व्यक्त केली आहे.
द पॅट्रियट या वृत्तपत्राने महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांचा भारत आता मरण पावला असून, भविष्यात भारतात दडपशाहीनेच सारे निर्णय घेतले जातील, असे म्हटले आहे. काश्मीरमध्ये रक्तपात होईल, असे परराष्ट्रमंत्री शाह मोहम्मद कुरेशी यांनी म्हटले आहे.