इस्लामाबाद: भारताच्या कठोर कारवाईनं पाकिस्तानमध्ये घबराट पसरली आहे. त्यामुळेच भारतीय हवाई दलाच्या कारवाईनंतर अवघ्या दोनच दिवसात पाकिस्ताननं शांतीचा सूर लावला आहे. आम्हाला शांतता हवी आहे. युद्ध करण्याची आमची इच्छा नाही, असं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज संसदेत म्हटलं. मात्र भारतावर टीका करता करता खान यांनी दहशतवादाचं अप्रत्यक्षपणे समर्थन केलं. विशेष म्हणजे पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला करणारा दहशतवादी आदिल अहमदचं त्यांनी समर्थन केलं. भारत सरकारकडून काश्मीरमध्ये अत्याचार सुरू आहेत. त्याचमुळे एक 20 वर्षांचा तरुण आत्मघाती हल्लेखोर झाला, असं इम्रान खान म्हणाले. आदिल अहमद डार स्वातंत्र्याची भाषा करत होता. त्यामुळेच त्यानं स्वत:ला स्फोटकांसह उडवलं, असंदेखील खान यांनी म्हटलं. आदिलचा पुरेपूर बचाव करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यासाठी खान यांनी तमिळ टायगर्सचा संदर्भ दिला. पाकिस्तान गेल्या 20 वर्षांपासून आपल्याच जमिनीवर दहशतवादाचा सामना करत असल्याचंदेखील खान म्हणाले. भारतावर टीका करताना खान यांनी दहशतवाद्यांचं समर्थन केलं. पुलवामातील हल्ला आपल्याच स्थानिक दहशतवाद्यानं केल्याचं जैश ए मोहम्मदनं जाहीर केलं होतं. जैशचा म्होरक्या मौलाना मसूद अजहरनं डारचं कौतुकदेखील केलं होतं. यासाठी अजहरनं ऑडिओ क्लिपदेखील जारी केली होती. संसदेत बोलताना इम्रान खान यांनी पुन्हा एकदा काश्मीर राग आळवला. गेल्या चार वर्षांपासून काश्मीरमध्ये स्वातंत्र्याची मागणी जोर धरु लागली आहे. याबद्दल भारतीय जनतेनं सरकारला प्रश्न विचारायला हवेत, असं खान म्हणाले.
काश्मीरवर बोलता बोलता इम्रान खान यांच्याकडून दहशतवादी डारचं समर्थन?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2019 9:23 PM