पाकच्या कबुलीमुळे फुटीर शक्तींचा झाला पर्दाफाश, पुलवामा प्रकरणी नरेंद्र मोदींचे भाष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2020 02:03 AM2020-11-01T02:03:40+5:302020-11-01T06:14:12+5:30
Narendra Modi : भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४५ व्या जयंतीदिनी राष्ट्रीय एकता दिनानिमित्त शनिवारी गुजरातमधील त्यांच्या भव्य पुतळ्यासमोर निमलष्करी दलांच्या जवानांनी संचलन करून मानवंदना दिली.
केवडिया : काश्मीरमधील पुलवामा येथे पाकिस्ताननेच दहशतवादी हल्ला घडविल्याची कबुली त्या देशाच्या मंत्र्याने तेथील संसदेत दिली आहे. त्यामुळे या हल्ल्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या फुटीरतावादी शक्तींचा पर्दाफाश झाला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४५ व्या जयंतीदिनी राष्ट्रीय एकता दिनानिमित्त शनिवारी गुजरातमधील त्यांच्या भव्य पुतळ्यासमोर निमलष्करी दलांच्या जवानांनी संचलन करून मानवंदना दिली. त्यावेळी मोदी म्हणाले की, पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या बलिदानाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्यांच्या हातातले कोणीही खेळणे बनू नका. या हल्ल्याचा वापर करून काही लोकांनी केलेले स्वार्थी राजकारण व नाना आरोप आम्ही सहन केले. कारण ती वेळ प्रत्युत्तर देत बसण्याची नव्हती. या स्वार्थी लोकांचे वर्तन देश कधीही विसरणार नाही.
पुलवामामधील हल्ल्यात मिळालेले यश पाकिस्तानचे, इम्रान खान सरकारचे आहे, असे त्या देशाचे माहिती व तंत्रज्ञानमंत्री फवाद चौधरी दोन दिवसांपूर्वी म्हणाले होते. त्या पार्श्वभूमीवर मोदी म्हणाले की, घुसखोरीचे प्रयत्न करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारत सज्ज
आहे.