लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : रेल्वेचे तिकीट बुक करण्यासाठी आता सरसकट आधारचा तपशील देणे बंधनकारक करण्याचा निर्णय आयआरसीटीसीने घेतला आहे. सध्याच्या नियमानुसार, ६ तिकिटे विना आधार जोडणीची बुक करता येतात. त्यापुढील तिकिटांसाठी आधार तपशील द्यावा लागतो.
‘आयआरसीटीसी’कडून नवीन प्रणालीवर वेगाने काम सुरू आहे. ही प्रणाली कार्यरत झाल्यानंतर १ तिकीट बुक करायचे असले तरी ओळख पडताळणी बंधनकारक असेल. ओळख पडताळणीसाठी आधारसह पॅन किंवा पासपोर्ट क्रमांक उपयोगात आणता येऊ शकेल. आयआरसीटीसीची वेबसाइट किंवा ॲपद्वारे रेल्वे तिकिटे बुक करण्यासाठी, तुम्ही लॉग इन कराल, तेव्हा तुम्हाला आधार, पॅन किंवा पासपोर्ट क्रमांक टाकावा लागेल.
रेल्वे संरक्षण दलाचे (आरपीएफ) महासंचालक अरुण कुमार यांनी सांगितले की, आतापर्यंत फसवणुकीविरोधातील कारवाई मानवी बुद्धिमत्तेवर आधारित होती. ती पुरेशी परिणामकारक नव्हती. त्यामुळे आम्ही तिकिटासाठी लॉग इन करताना पॅन, आधार किंवा इतर ओळख दस्तऐवजांशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे तिकीट बुकिंगमधील फसवणूक थांबविता येऊ शकेल. आधार प्राधिकरणासोबतचे आमचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. संपूर्ण यंत्रणा स्थापन झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी केली जाईल.
अरुण कुमार यांनी सांगितले की, २०१९ च्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये दलालांवर कारवाई सुरू झाली होती, तेव्हापासून १४,२५७ दलालांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत २८.३४ कोटींची बनावट तिकिटे पकडली गेली आहेत. अरुण कुमार म्हणाले की, रेल्वे सुरक्षा ॲप विकसित केले गेले आहे. तेथे फसवणुकीबाबत तक्रारी करता येतील. ६,०४९ स्थानकांवर तसेच सर्व प्रवासी ट्रेनच्या डब्यांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची योजना आहे.