रिल्स बनवण्यासाठी गाडी घेऊन हायवेवर आले. धिंगाणा घालू लागले. रिल्सच्या नादात इतके बेभान झाले की, गोंधळ करत विधानसभा अध्यक्षांची गाडीच ओव्हरटेक केली. त्यानंतर पाचही जणांना आयुष्यभराची अद्दल घडलीये. पोलिसांनी पाच तरुणांना गुन्हा दाखल करत अटक केली आणि गाडी जप्त केली आहे.
ही घटना घडली आहे राजस्थानातील अजमेर जयपूर महामार्गावर. राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष अजमेरवरून जयपूरला येत होते. त्याचवेळी i20 कारमधून पाच तरुण विधानसभा अध्यक्षांच्या गाडीचा पाठलाग करू लागले.
अध्यक्षांच्या गाडीला ओव्हरटेक करायचे परत बाजूला यायचे. जीवघेणी स्टंटबाजी सुरू होती. विधानसभा अध्यक्षांच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांचा धिंगाणा सुरूच होता. विधानसभा अध्यक्षांच्या गाडीचा ते पाठलाग करत राहिले.
त्यानंतर याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला देण्यात आली. पोलिसांनी अजमेर जयपूर मार्गावर असलेल्या टोलनाक्यावर बॅरिकेट्स लावून त्यांना थांबण्याचा प्रयत्न केला, पण ते बॅरिकेट्स तोडून निघून गेले.
पोलिसांनी पाच जणांना कसे पकडले?
बॅरिकेट्स तोडून फरार झालेल्या तरुणांच्या गाडीचा नंबर पोलिसांनी घेतला. त्यावरून त्यांची ओळख काढण्यात आली. काही तासाने पाचही तरुणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले.
पोलीस उपायुक्त अमित कुमार यांनी सांगितले की, तरुणांची चौकशी करण्यात आली. त्यावेळी तरुणांनी सांगितले की, अजमेर मार्गावर विधानसभा अध्यक्षांची गाडी दिसली. त्यांच्या गाडीचा पाठलाग करायचा आणि त्याची रिल्स बनवायची असे त्यांनी ठरवले आणि नंतर तसे केलेही.
पोलिसांनी या प्रकरणात गणेश सैनी, राहुल कुमावत, साहिल कुमावत, लोकेश यादव यांना अटक केली. तर एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले. हे सर्वजण जयपूरमधील बगरू येथील रहिवासी आहेत.