EXCLUSIVE- पालकांनो मुलांना शाळेत पाठवताना सुरक्षा यंत्रणेकडेही लक्ष द्या- डॉ. हरिश शेट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2017 12:22 PM2017-09-12T12:22:10+5:302017-09-12T12:45:47+5:30
पालकांनी आपल्या पाल्याला शाळेत पाठवताना, विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी काही खबरदारीचे उपाय योजण्याची आवश्यकता आहे, असं मत प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ डॉ. हरिश शेट्टी यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केलं.
मुंबई, दि.१२- गुरुग्राम येथिल रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये एका सात वर्षांच्या मुलाची हत्या करण्याचं प्रकरण घडलं. शाळेमध्ये शिकायला गेलेल्या पाल्याबाबत घडलेली ही घटना संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी होती. त्यामुळेच यापुढे पालकांनी आपल्या पाल्याला शाळेत पाठवताना, विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी काही खबरदारीचे उपाय योजण्याची आवश्यकता आहे, असं मत प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ डॉ. हरिश शेट्टी यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केलं. पालक शिक्षक संघटनेनेही या मुद्द्याकडे लक्ष द्यावं, असं मत डॉ. शेट्टी यांनी व्यक्त केलं आहे. प्रत्येक शाळेत चाइल्ड प्रोटेक्शन पॉलिसी तयार केली जावी आणि त्यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, पालक यांचा समावेश असावा. शाळा व मुलांच्या कुटुंबांचं एक संयुक्त कुटुंबच बनलं पाहिजे, असं डॉ. शेट्टी यांनी लोकमतशी बोलताना सांगितलं.
मुलाला शाळेत पाठवताना पालकांनी काही प्रश्न स्वतःला विचारावेत असे त्यांनी सुचवले. ते प्रश्न पुढीलप्रमाणे -
- सिक्युरिटी कॅमेऱ्यात टिपली जाणारी हालचाल सुरक्षारक्षकांद्वारे सतत लाइव्ह तपासली जात आहे का?
- मुलांची स्वच्छतागृहं फक्त मुलंच वापरत आहेत की प्रौढ लोकही त्यामध्ये जात आहेत ?
- ज्या स्वच्छतागृहात विद्यार्थी जातात त्यामध्येच स्कूलबसचे कंडक्टर आणि त्याचे चालक जातात का की ते वेगळे स्वच्छतागृह वापरतात?
- प्रत्येक मजल्यावर महिला आणि पुरुष सुरक्षारक्षक आहेत का ?
- सुरक्षारक्षकही सीसीटीव्हीच्या कक्षेत आहेत का ?
- शाळा व महाविद्यालय एकाच प्रांगणात असेल तर महाविद्यालयाचे विद्यार्थी लहान मुलांचे स्वच्छतागृह वापरतात का ? तसे झाल्यास त्यांना अडवण्यास सुरक्षारक्षक आहेत का ?
- शाळेची सुरक्षाव्यस्था मुख्याध्यापक नियमित तपासतात का ?
- सर्व व्यवस्थेचे योग्य ऑडिट होतं का ?
- मुलांकडून फिडबॅक किंवा सूचना मागवल्या जातात का ? त्यावर काही अंमलबजावणी होते का ?-
- सुरक्षाव्यवस्था सक्षम असावी यासाठी शाळेचे शिक्षक जागरुक आहेत का ?