नवी दिल्ली: संसद घुसखोरी प्रकरणात काउंटर इंटेलिजन्स, आयबी, रॉ आणि दिल्लीपोलिसांचे विशेष सेल तपास करत आहेत. या तपास संस्थांना दिल्ली दंगल, टूलकिट आणि शेतकरी आंदोलनाप्रमाणे या प्रकरणातील आरोपींनाही हवाला किंवा अन्य माध्यमातून मोठा निधी उपलब्ध झाल्याचा संशय आहे. या घटनेमागे मोठे चेहरे असण्याची शक्यताही तपास यंत्रणांनी वर्तवली आहे.
बँक डिटेल्स तपासले जाणार
या पडद्यामागच्या मोठ्या चेहऱ्यांनी आरोपींशी थेट संबंध न ठेवता, आपल्या प्याद्यांमार्फत हा गुन्हा घडवून आणला, असा संशय आहे. त्यामुळेच तपास यंत्रणा प्रत्येक बाजूने या प्रकरणाचा तपास करत आहे. आरोपींना कुठून निधी मिळाला का, हे तपासण्यासाठी दिल्ली पोलिसांच्या पथकांनी सहाही आरोपींच्या बँक खात्यांचा तपशील घेतला आहे.
सोशल मीडियाची माहिती मागवणारपोलिसांनी आरोपीच्या मोबाईल फोन आणि सोशल मीडिया खात्यांवरील डेटा ऍक्सेस करण्यासाठी फॉरेन्सिक विभाग आणि फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप ऑपरेट करणाऱ्या मेटाची मदतही घेतली आहे. रविवारी दिल्ली पोलिसांच्या विविध पथकांनी आरोपीच्या कुटुंबीयांशीही संपर्क साधला. दिल्ली पोलिसांच्या काउंटर इंटेलिजन्सने, आरोपींनी तयार केलेल्या 'भगत सिंग फॅन क्लब' या डिलीट केलेल्या फेसबुक पेजचा तपशील मिळवण्यासाठी मेटाला पत्र लिहिले आहे.
राजस्थानमध्ये आरोपींच्या जळलेल्या मोबाईलचे तुकडे सापडल्यानंतर पोलिसांनी ते फॉरेन्सिक विभागाकडे पाठवले आहेत. यातून डेटा रिकव्हर करण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच, पोलिसांनी मेटाला आरोपींच्या व्हॉट्सअॅप चॅट्सचे तपशील देण्याची विनंतीही केली आहे. दरम्यान, अटक केलेल्या सहा जणांवर (सागर शर्मा, मनोरंजन डी, नीलम देवी, अमोल शिंदे, ललित झा आणि महेश कुमावत) पोलिसांनी यूएपीए आणि दहशतवादविरोधी आरोपांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.