संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांना संबोधित केलं आहे. "राजकीय तापमान वेगाने वाढत आहे. काल चार राज्यांच्या निवडणुकांचे निकाल आले. निकाल खूप उत्साहवर्धक आहेत. सामान्य लोकांच्या कल्याणासाठी, देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी कटिबद्ध असलेल्यांना प्रोत्साहन देणारे आहेत" असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.
"जेव्हा सुशासन असतं, लोककल्याणासाठी समर्पण असतं. तेव्हा सत्ता-विरोधी हा शब्द अप्रासंगिक ठरतो. तुम्ही सत्ता समर्थक, सुशासन किंवा पारदर्शकता असं म्हणू शकता. एवढ्या उत्कृष्ट सार्वजनिक जनादेशानंतर आम्ही संसदेच्या या नव्या मंदिरात भेटत आहोत. पराभवाचा राग संसदेत काढू नका" असं मोदींनी विरोधकांना सांगितलं आहे.
"थंडी हळू हळू जाणवत आहे पण सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. चार राज्यांचे निकाल उत्साहवर्धक होते. सर्व समाज, शहरं आणि खेड्यातील प्रत्येक समाजातील तरुण, महिला, शेतकरी आणि गरीब यांच्या पाठिंब्याने हे निकाल आले आहेत. इतक्या चांगल्या जनादेशानंतर आम्ही नव्या संसदेत बैठक घेत आहोत. यावेळी तुम्हाला या संसदेत दीर्घकाळ काम करण्याची संधी मिळणार आहे. नव्या संसदेत काही उणिवा असतील तर त्या मिळून दूर केल्या जातील."
काँग्रेसवर निशाणा
"देशाने नकारात्मकता नाकारली आहे. संसदेपूर्वी विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा होते, ती यावेळीही झाली. मी सर्व खासदारांना विनंती करतो की हे लोकशाहीचे मंदिर लोकांच्या आशा-आकांक्षांचे आणि विकसित भारत घडवण्याचे व्यासपीठ आहे. सर्व खासदारांनी तयार होऊन चांगल्या सूचना द्याव्यात, पण चर्चा झाली नाही तर देश त्यापासून वंचित राहतो" असं देखील नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.