नवी दिल्ली – देशाचं विभाजन व्हायला नको होतं, ही एक ऐतिहासिक चूक आहे. देशाचं दुर्दैवाने विभाजन झालं. जे व्हायला नको होतं, भारत आणि पाकिस्तान हिंदू महासभेच्या मागणीवर बनला आहे, मोहम्मद अली जिन्ना यांच्यामुळे नाही असं विधान AIMIM प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केले आहे. समाजवादी पार्टीचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी केलेल्या विधानावरून ओवैसी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
हैदराबादचे खासदार ओवैसी यांनी म्हटलं की, या देशाला ऐतिहासिक पार्श्वभूमी होती. परंतु दुर्दैवाने देशाचे विभाजन झाले. असं व्हायला नको होते. मी फक्त हेच सांगू शकतो, परंतु जर तुम्ही यावर डिबेट ठेवले तर मी देशाच्या विभाजनाला खरे जबाबदार कोण हे सांगू शकतो. मी त्यावेळच्या या ऐतिहासिक चुकीवर केवळ एका ओळीत उत्तर देऊ शकत नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच देशाचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आजाद यांचे इंडिया विंस फ्रिडम हे पुस्तक वाचा. त्यात कसं ते काँग्रेस नेत्यांकडे गेले आणि त्यांनी देशाच्या विभाजनाचा प्रस्ताव स्वीकार न करण्याचं आवाहन केले होते असंही ओवैसी म्हणाले. या देशाचे विभाजन नको व्हायला होते. विभाजन चुकीचे होते. त्याकाळी जितके नेते होते, ते सर्व यासाठी जबाबदार आहेत. जर तुम्ही मौलाना अबुल कलाम आजाद यांचे पुस्तक इंडिया विंस फ्रिडम वाचले तर मौलाना आजाद यांनी सर्व काँग्रेस नेत्यांना देशाचे विभाजन करू नका अशी मागणी केली होती असंही ओवैसींनी सांगितले.
दरम्यान, असदुद्दीन ओवैसी यांचे हे विधान अशावेळी आलंय जेव्हा पुढील महिन्यात तेलंगणा विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. राज्यात ३० नोव्हेंबरला मतदान आणि ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत ओवैसी हे भाजपासोबतच काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा घेताना दिसत आहेत.