नवी दिल्ली : एकीकडे उत्तर भारतात थंडीचा कहर सुरू असताना दुसरीकडे आज सकाळी (शनिवार) राजधानी दिल्ली आणि परिसरात पावसाच्या तुरळक सरी बरसल्याची माहिती मिळाली आहे. राजधानी दिल्लीतील पारा १.१ अंशांवर गेला आहे. आगामी दोन दिवस दिल्लीसह हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दिल्लीत ०२ जानेवारी ते ०५ जानेवारी या कालावधीत तुरळक ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. तसेच दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी क्षेत्र, उत्तर प्रदेश आणि हरियाणाच्या काही भागात पुढील चार ते पाच दिवस नियमित अंतराने पाऊस पडेल, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली. हवामान विभागानुसार, रेवाडी, गुरुग्राम, सोनीपत, मथुरा, हाथरस, जिंद, पानीपत, करनाल, शामली, सहारनपुर, बागपत या भागांमध्ये पाऊस पडेल. पाऊस पडल्याने तापमानात आणखी घट होऊन आगामी दोन दिवसात दिल्लीवासीयांना शीतलहरीचा सामना करावा लागू शकेल, असेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
अफगाणिस्तान आणि लगतच्या काही परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, तो पाकिस्तानकडे सरकत आहे. यामुळे दक्षिण-पश्चिम राजस्थानावर याचा परिणाम जाणवर असून, तापमान आणखी कमी होईल. जम्मू-काश्मीरसह हिमालयीन क्षेत्रात जोरदार बर्फवृष्टी होऊ शकेल, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
उत्तर भारतात थंडीचा कहर आगामी काही दिवस कायम राहणार असून, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, चंडीगड, दिल्ली आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये थंडीचा जोर आणखी वाढू शकेल, असेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, ०१ जानेवारी २०२१ रोजी दिल्लीतील पारा १.१ अंशांपर्यंत खाली आला होता. हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील बहुतांश भागात बर्फाची चादर पसरलेली आहे. जम्मू काश्मीरमधील गुलमर्ग येथील तापमान उणे ९ अंशांवर गेले आहे. तसेच काश्मीर खोऱ्यातील अनेक भागातही तापमान उणे अंशांवर गेले आहे.