डिझेल 100 रुपयांवर गेल्याने प्रवासी व मालवाहतूक महागली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 05:56 AM2021-10-23T05:56:18+5:302021-10-23T05:56:47+5:30
आतापर्यंतचा उच्चांक; अन्नधान्ये आणि भाज्यांचीही दरवाढ
नवी दिल्ली : पेट्रोल व डिझेलच्या दरात शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी ३५ पैशांची वाढ झाली. त्याबरोबर दोन्ही इंधनांचे दर पुन्हा एकदा उच्चांकावर गेले आहेत. डिझेलचे दर १०० रुपयांवर गेल्याने राज्यात आणि देशभर मालवाहतूकही महागली आहे. परिणामी अन्नधान्ये व भाज्या, फळे यांच्या किंमतीही वाढू लागल्या आहेत.
ज्या ठिकाणी रिक्षा मीटरवर नाहीत, तिथे रिक्षाचालक ग्राहकांकडून जादा रक्कम मागू लागले आहेत. तसेच वडाप तसेच ग्रामीण भागांतील टॅक्सीचालक यांनीही भाड्यात वाढ केली आहे. खासगी तसेच शाळांच्या बसेसही डिझेल महागल्याने दरवाढ करण्याच्या तयारीत आहेत. टूर्स व ट्रॅव्हल कंपन्यांनी तर भाडे चार दिवसांपूर्वीच वाढवले आहे.
आजच्या दरवाढीनंतर राजधानी दिल्लीत पेट्रोल १०६.८९ रुपये लिटर, तर मुंबईत ११२.७८ रुपये लिटर झाले. डिझेलचे दर मुंबईत १०३.६३ रुपये, तर दिल्लीत ९५.६२ रुपये लिटर झाले.
१८ आणि १९ ऑक्टोबर असे दोन दिवस इंधनाच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. त्यानंतर आता सलग तिसऱ्या दिवशी प्रत्येकी ३५ पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्याआधीच्या सलग चार दिवसांतही प्रत्येकी ३५ पैसे वाढ करण्यात आली होती.
भारतातील सर्व प्रमुख शहरांतील पेट्रोलचा दर आता १०० रुपयांच्या वर गेला आहे. तसेच डझनभर राज्यांत डिझेलही शंभरीपार झाले आहे. श्रीनगर आणि चेन्नई यासारख्या काही शहरांत डिझेल शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. श्रीनगरमध्ये डिझेल ९९.४९ रुपये लिटर, तर चेन्नईमध्ये ९९.९२ रुपये लिटर झाले आहे. प्रत्येक राज्यात स्थानिक कर भिन्न असल्यामुळे इंधनाचे दरही भिन्न आहेत.
सप्टेंबरमध्ये तीन आठवडे इंधन दरांत कोणताही बदल करण्यात आला नव्हता. २८ सप्टेंबरपासून दरवाढ पुन्हा सुरू करण्यात आली. तेव्हापासून पेट्रोलच्या दरात १९ वेळा, तर डिझेलच्या दरात २२ वेळा वाढ करण्यात आली आहे. या काळात पेट्रोल ५.७ रुपयांनी, तर डिझेल ७ रुपयांनी महागले आहे.
१४ राज्यांत शंभरी
डिझेलचा दर शंभर रुपयांपेक्षा अधिक झालेल्या राज्यांत मध्य प्रदेश, राजस्थान, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड, बिहार, केरळ, कर्नाटक, झारखंड, गोवा आणि लडाख यांचा समावेश आहे. याशिवाय अनेक ठिकाणी डिझेल शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे देशांतर्गत इंधन दर वाढले आहेत.