अहमदाबाद, दि. 28 - गुजरातमधील पाटीदार आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल आणि दिनेश बामडिया यांना पोलिसांनी दरोडा घातल्याच्या आरोपावरुन अटक केल्याचे वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हार्दिक पटेल आणि त्यांच्या सहा सहका-यांविरोधात पाटण जिल्ह्यात दरोडा घातल्याचा गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. पाटीदार आंदोलन समितीशी निगडीत असलेल्या मेहसाणा जिल्ह्यातील एका संयोजकानेच हा गुन्हा दाखल केला आहे.
नरेंद्र पटेल असे या संयोजकाचे नाव आहे. गेल्या शनिवारी हार्दिक पटेल आणि त्यांच्या सहका-यांनी मला पाटण येथील एका हॉटेलमध्ये बोलविले होते. त्यावेळी हार्दिक पटेल आणि सहका-यांनी मला अपमानित केले आणि मारहाण केली. तसेच, माझ्या गळ्यातील सोन्याची साखळी काढून घेतली आणि हॉटेलमधून बाहेर काढले होते, असा आरोप मेहसाणा जिल्ह्यातील संयोजक नरेंद्र पटेल यांनी केला आहे.
दरम्यान, याप्रकरणी संयोजक नरेंद्र पटेल यांनी हार्दिक पटेल यांच्यासह सुनिल खोखारिया, ब्रिजेश पटेल, धवल पटेल, दिनेश बामडियासह सहा जणांविरोधात पाटण पोलीस ठाण्यात दरोडा आणि मारहाणीची तक्रार दाखल केला होती.