पटना : लोकसभा निवडणुकीसाठी विविध पक्षांनी उमेदवार घोषित करण्यास सुरुवात केली असून विरोधकांसह सत्ताधारी भाजपालाही नाराजांचा सामना करावा लागत आहे. पटना विमानतळावर चक्क भाजपच्या दोन बड्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्येच जोरदार हाणामारी झाली. एका नेत्याचे तिकीट कापल्याने ही नाराजी उफाळून आली आहे.
केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद आणि खासदार आर के सिन्हा हे मंगळवारी दिल्लीहून पटना विमानतळावर आले. यावेळी दोघांच्याही समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. प्रसाद यांना पटना साहिब येथून लोकसभेची उमेदवारी भाजपने दिली आहे. यामुळे सिन्हा समर्थक नाराज झाले होते. दोन्ही नेते विमानतळावर येताच प्रचंड घोषणाबाजी झाली. याचे पर्यावसान हाणामारीमध्ये झाले. दोन्ही बाजुने मोठ्या प्रमाणावर लाथा-बुक्के मारण्यात आल्याने भाजपामध्येही सारे काही आलबेल नसल्याचे समोर आले आहे.
काही दिवसांपूर्वीत उत्तर प्रदेशचे भाजपाचे खासदार आणि आमदार यांच्यात बुटा-चप्पलांची मारामारी गाजली होती.
पटना साहिब या जागेवर भाजपाने रविशंकर प्रसाद यांना तिकीट दिले आहे. या जागेवर सिन्हा यांना तिकीट हवे होते. यानंतर जेव्हा प्रसाद विमानतळावर आले तसे सिन्हा समर्थकांनी त्यांना काळे झेंडे दाखविले. यावरून चिडलेल्या प्रसाद समर्थकांनी सिन्हा समर्थकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. दोन्हा गट एकमेकांना भिडल्याने विमानतळावर बराच वेळ तणाव निर्माण झाला होता.