श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत- पाकिस्तान दरम्यान तणावाचे वातावरण आहे. सीमेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरुच आहे. दरम्यान, पुलवामा हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि 'पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी'च्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन चर्चेत येत आहे.
काश्मीरमधील 'जमात-ए इस्लामी' या संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. तसेच,'जमात-ए इस्लामी' संघटनेच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावरुन मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. भारत आणि पाकिस्तान सीमा भागात आपला ड्रामा करत आहे. त्याचा त्रास काश्मीरमधील सामान्य नागरिकांना होत आहे, असा आरोप मेहबूबा मुफ्ती यांनी सरकारवर केला आहे. तसेच, 'जमात-ए इस्लामी'वर घातलेल्या बंदीच्या विरोधात मेहबूबा मुफ्ती यांनी पार्टीच्या कार्यकर्त्यांसोबत निदर्शने केली.
दरम्यान, दहशतवादी कारवायांच्या आरोपावरून केंद्रीय गृहमंत्रालयाने गुरुवारी काश्मीरमधील 'जमात-ए इस्लामी' या संघटनेवर पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे. 'जमात-ए इस्लामी'ची स्थापना 1942 मध्ये झाली असून, पाकिस्तानधार्जिणी असल्यामुळे या संघटनेवर आतापर्यंत तीन वेळा बंदी घालण्यात आली आहे.