पणजी, दि. 23 - पणजी मतदारसंघात विधानसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पणजीमध्ये 98 टक्के मतदार भाजपाला मतदान करतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. मतदानानंतर मनोहर पर्रीकर म्हणाले की, ''मला कुणी विरोधक नाहीच. ही निवडणूक माझ्या गोव्यातील पुनरागमनावर मोहोर उठविणार आहे. मला पुरेसे मताधिक्य मिळेल. सार्वत्रिक निवडणुकीत मी गोवाभर प्रचाराचा झंझावात केला. यावेळीही पणजीत पहाटे ५ ते रात्री १0 वाजेपर्यत प्रचार केला. कोणतीही निवडणूक असो,मी गांभीर्यानेच घेतो. कारण मतदारांना गृहीत धरुन चालत नाही. पणजीसाठी मी अनेक विकासकामे केलेली आहेत आणि त्यामुळेच लोक माझ्या पाठीशी आहेत''.
पर्रीकर यांचे प्रचारप्रमुख तथा माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येंकर म्हणाले की, 'लोकांना अधिकाधिक मतदान करण्यासाठी बाहेर पडावं, यासाठी आमचा प्रयत्न आहे'. दरम्यान, टोंक करंझाळे भागात भाजपा आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याची माहिती समोर आली. काँग्रेसने या प्रकरणी सिद्धार्थ यांच्याविरुध्द पोलीस तक्रार केली आहे.
मनोहर पर्रीकर विक्रमी मताधिक्यानं विजय होतील - श्रीपाद नाईक दरम्यान, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर विक्रमी मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास भाजपाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केला आहे. सांपेद्र येथील रायबंदर सरकारी प्राथमिक शाळेतील केंद्रावर दुपारी मतदान केल्यानंतर नाईक म्हणाले की, ''गेल्या निवडणुकांपेक्षा यावेळी मनोहर पर्रीकर यांना जास्त मताधिक्य मिळेल. पर्रीकर यांनी ज्या पद्धतीनं गोव्याचा विकास केला आहे ते पाहता लोकं त्यांच्याबरोबरच राहतील. वाळपईत विश्वजित राणे हे यशस्वी आणि कर्तबगार मंत्री म्हणून ओळखले जातात त्यांनाही लोकांचा पाठिंबा आहे. दोन्ही मतदारसंघामध्ये भाजपाला बाहेरुन उमेदवार आणावे लागले''. दुसरीकडे गोवा सुरक्षा मंचचे मार्गदर्शक तथा माजी संघप्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी मात्र या निवडणुकीत त्यांचा उमेदवार आनंद शिरोडकर हे पर्रीकर यांचा पराभव करुन निवडून येतील, असा दावा केला आहे.