नवी दिल्ली: पेगासस स्पायवेयरमुळे संसदेत एकच गोंधळ पाहायला मिळाला आहे. केंद्रीय मंत्री, न्यायाधीश यांच्यासह पत्रकारांवर त्याच्या मोबाईलच्या माध्यमातून पाळत ठेवली जात असल्याचा आणि हेरगिरी होत असल्याचा आरोप आहे. यावरून विरोधकांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. तर सरकारनं याबद्दलच्या वृत्तावर आणि ते प्रकाशित झाल्याच्या टायमिंगवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. संसदेचं कामकाज चालू न देण्यासाठीच अधिवेशनाच्या एक दिवस आधी पेगाससचा विषय चर्चेत आणला गेला, असा संशय केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी व्यक्त केला आहे.
आता पेगासस प्रकरणात आणखी एक नवी माहिती समोर आली आहे. २०१९ मध्ये कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि जनता दलाचं (सेक्युलर) सरकार होतं. या सरकारशी संबंधित काही फोन नंबर संभाव्य लक्ष्य होते. जुलै २०१९ मध्ये काँग्रेस-जेडीएसचं सरकार कोसळलं आणि भाजपनं सत्ता स्थापन केली. या संपूर्ण घटनाक्रमाचा कथित हेरगिरीशी संबंध असल्याचं 'द वायर'नं वृत्तात म्हटलं आहे.
२०१९ मध्ये कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएसचं सरकार होतं. एच. डी. कुमारस्वामी मुख्यमंत्री, तर जी. परमेश्वर उपमुख्यमंत्री होते. त्याआधी काँग्रेसचे सिद्धारामय्या राज्याचे मुख्यमंत्री होते. विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या. मात्र त्यांना बहुमताचा आकडा गाठता आला नाही. त्यामुळे दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या काँग्रेसनं जेडीएससोबत सत्ता स्थापन केली. विशेष म्हणजे काँग्रेसला ८०, तर जेडीएसला ३७ जागा मिळाल्या होत्या. मात्र भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसनं जेडीएसला मुख्यमंत्रिपद दिलं.
काँग्रेस-जेडीएसचं सरकार काही महिने चाललं. २०१९ मध्ये ते कोसळलं. या कालावधीत तत्कालीन मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर, माजी मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या सचिवांच्या फोन क्रमांकांची निवड संभाव्य लक्ष्य म्हणून करण्यात आली होती. क्रमांकांच्या रेकॉर्ड्सचा आढावा घेत असताना हे क्रमांक दिसून आल्याचं 'द वायर'नं आपल्या वृत्तात म्हटलं आहे.