जनतेने नव्या वर्षात स्वदेशी वस्तू वापरण्याचा करावा संकल्प- पंतप्रधान नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2020 01:32 AM2020-12-28T01:32:37+5:302020-12-28T06:59:54+5:30
‘मन की बात’ कार्यक्रमात केले आवाहन
नवी दिल्ली : देशातील जनतेने नव्या वर्षात विदेशी वस्तूंऐवजी स्वदेशी बनावटीच्या वस्तू वापरण्याचा संकल्प करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमामध्ये रविवारी केले.
यंदाच्या वर्षातील मन की बातचा हा अखेरचा कार्यक्रम होता. पंतप्रधान म्हणाले की, आत्मनिर्भर भारताच्या कार्यक्रमांतर्गत व्होकल फॉर लोकल ही मोहीम सरकार राबवत आहे. देशात जागतिक दर्जाची उत्पादने तयार होण्यासाठी उद्योजकांनी पुढाकार घ्यायला हवा. यंदा आत्मनिर्भर भारताच्या मोहिमेला जनतेने उत्तम प्रतिसाद दिला. प्रत्येक घराघरात स्वदेशी वस्तूंच्या वापरांविषयीचा संदेश पोहोचला आहे. मोहिमेबद्दल लोकांनी आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात.
नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, लोकांनी दररोज वापरात येणाऱ्या वस्तूंची एक यादी तयार करावी. त्यात जर विदेशी बनावटीच्या वस्तू असतील तर त्याऐवजी स्वदेशी वस्तूंचा वापर सुरू करावा. स्वदेशी वस्तूंविषयी लोकांच्या मानसिकतेत अवघ्या एका वर्षाच्या आत मोठा सकारात्मक बदल झाला आहे. लोकांनी प्लॅस्टिकचा वापरही कमी करावा असेही ते म्हणाले.
केशराला ख्याती मिळवून देणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, काश्मीरचे केशर हे जागतिक ख्यातीचे व मोठ्या खपाचे उत्पादन बनावे यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. त्याला नक्की यश येईल.