दिल्लीत 77 रुपयांना मिळणारं पेट्रोल मुंबईत 85 रुपयांना का?... हे आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2018 03:34 PM2018-05-24T15:34:52+5:302018-05-24T15:44:08+5:30
पेट्रोल व डिझेल या इंधनांच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनात महागाईचा भडका उडाला आहे.
मुंबई - पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनात महागाईचा भडका उडाला आहे. इंधन दरवाढीमुळे महागाईचे चटके सहन करावे लागतात आहेतच, शिवाय महिन्याभराचं बजेटही कोलमडत असल्यानं सर्वसामान्य अक्षरशः संतापले आहेत.
गेल्या 11 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. राजधानी नवी दिल्लीमध्ये आजचे पेट्रोलचे प्रतिलिटर दर 77.47 रुपये असून काही शहरांमध्ये हा आकडा 80 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. मुंबईमध्ये आज पेट्रोल प्रतिलिटर 85.29 रुपये दरानं मिळत आहे.
दरम्यान, पेट्रोलच्या दरांमध्ये शहरांनुसार फरक का आहे? असा प्रश्न बऱ्याच जणांना पडला असावा. तर आपण जाणून घेऊया की आकड्यांमध्ये हा एवढा फरक का असतो. सरकारी नियमांमुळेच नवी दिल्ली आणि मुंबईतील पेट्रोलच्या दरांमध्ये फरक पाहायला मिळतो.
पेट्रोल-डिझेलवरील करामुळे नवी दिल्ली, मुंबई आणि देशातील अन्य राज्यांमध्ये पेट्रोल व डिझेलची वेगवेगळ्या दरांमध्ये विक्री होते.
पेट्रोलियम प्लानिंग अँड अॅनालिसिस सेलनं दिलेल्या माहितीनुसार, नवी दिल्लीमध्ये पेट्रोलच्या प्रतिलिटर दरावर 27 टक्के व्हॅट आकारला जातो, तर मुंबईत पेट्रोलवर 39.78 टक्के व्हॅट आहे. यामुळे प्रत्येक राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये मोठा फरक पाहायला मिळतो.
(विराटचं 'चॅलेंज' स्वीकारणाऱ्या मोदींनी पेट्रोल स्वस्त करण्याचंही चॅलेंजही स्वीकारावं-राहुल गांधी)
डिझेलच्या दरांबाबत सांगायचे झाले तर, नवी दिल्लीत 17.27 टक्के व्हॅट तर मुंबईमध्ये 24.84 टक्के व्हॅट आकारला जातो.
पेट्रोल बिल्डअप प्राइसनुसार, इंडियन ऑइल कंपनीनं 24 मे रोजी विक्रेत्यांना पेट्रोल प्रतिलिटर 37.89 रुपये दरानं विकले. यानंतर विक्रेत्यांनी 3.63 रुपये आपलं कमिशन जोडले. यानंतर येतं टॅक्सचं गणित. केंद्र सरकारनं प्रतिलिटरनुसार 19.48 रुपये अबकारी कर म्हणून वसूल केला. यानंतर दिल्ली सरकारनं व्हॅट स्वरुपात 16.47 रुपये जोडले. अशा पद्धतीनं नवी दिल्लीमध्ये पेट्रोलची प्रतिलिटर किंमत 77.47 रुपये मोजावी लागत आहे.
मुंबईमध्येही अशा पद्धतीनं दरवाढ झालेली आहे. अबकारी कर आणि विक्रेत्यांचं कमिशन जोडल्यानंतर प्रतिलिटर पेट्रोलचे दर 61 रुपयांहून अधिक झाले. यानंतर 39.78 टक्के व्हॅट जोडण्यात आला. यानंतर पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 85.29 रुपयांपर्यंत पोहोचली. हाच नियम डिझेलसंदर्भातही लागू होतो.अशाच पद्धतीनं अन्य राज्यांमध्येही पेट्रोल आणि डिझेलवर लावण्यात येणाऱ्या करामुळे किंमतींमध्ये फरक दिसून येतो.
पेट्रोल-डिझेलवरील कर टक्क्यात नाही रुपयांत
गगनाला भिडलेले पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यासाठी त्यावरील कर टक्क्यांऐवजी रुपयामध्ये आकारण्याचा केंद्र सरकार विचार करीत आहे. यामुळे इंधनाचे दर ३५ टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतील. वित्त मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले की, पेट्रोल-डिझेलचे दर ६० ते ८० रुपयांच्या दरम्यान असल्यास त्यावर ८ ते १० रुपये कर लावला जाईल. हेच भाव ८० ते ९० रुपयांवर गेले तर या कराचा दर ५ ते ८ रुपये निश्चित केला जाईल. यामुळे इंधन दरात मोठा दिलासा मिळू शकेल.