गुजरात हायकोर्टातील शिपाई पदासाठी पीएचडीधारकांचे अर्ज; डॉक्टर, इंजीनियरदेखील रांगेत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2019 11:14 AM2019-10-09T11:14:58+5:302019-10-09T11:16:58+5:30
रोजगाराच्या संधी नसल्यानं उच्चशिक्षण घेऊनही शिपाई होण्याची वेळ
अहमदाबाद: गुजरात उच्च न्यायालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी भरती परीक्षा नुकतीच पार पडली. शिपाई पदासाठी सुरू असलेल्या या भरतीसाठी अनेक उच्चशिक्षितांनी अर्ज केले होते. यामध्ये पीएडीधारकांसह डॉक्टर, बीटेक इंजिनीयर यांच्यासह पदवीधारकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे गुजरात उच्च न्यायालयातील न्यायाधीशांइतकी शैक्षणिक पात्रता असलेल्या तरुणांनीदेखील त्याच न्यायालयात शिपाई म्हणून काम करण्यासाठी अर्ज केले.
उच्च न्यायालयात शिपाई म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीला ३० हजार रुपये वेतन मिळतं. सध्या गुजरात उच्च न्यायालयातील चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या ११४९ जागांची भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी नुकतंच एका परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परीक्षेला पदवीधारक, डॉक्टर्स, एलएलएम परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार होते. या अर्जदारांची संख्या तब्बल १,५९,२७८ इतकी होती. मासिक ३० हजार रुपयांच्या पगारासाठी १९ पीएचडीधारकांनी अर्ज केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
शिपाई पदासाठी देण्यात आलेल्या परीक्षेत सात डॉक्टर उत्तीर्ण झाले. त्यांनी ही नोकरीदेखील स्वीकारली. उच्च न्यायालयात न्यायाधीश होण्यासाठी एलएलएम पदवी लागते. मात्र एलएलएम पदवी असलेल्या अनेकांनीदेखील शिपायाची नोकरी स्वीकारली आहे. त्यामुळे राज्यातील तरुणांना नोकरीच्या संधी नसल्याचं अधोरेखित झालं आहे. शिपाई पदासाठी अर्ज करणाऱ्यांमध्ये पदवी घेतलेल्यांची संख्या ४४९५८ इतकी आहे. यापैकी ५४३ जणांची नियुक्ती झाली आहे. तर इंजीनियर असलेल्या ५७२७ पैकी ११९ जणांची निवड करण्यात आली आहे.