टिपू सुलतानचा फोटो हटवण्यात येणार नाही - दिल्ली विधानसभा अध्यक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2018 02:35 PM2018-02-01T14:35:41+5:302018-02-01T14:36:06+5:30
टिपू सुलतानच्या फोटोवरुन नवीन वाद सुरू झाला आहे. दिल्ली विधानसभेच्या कॉरिडोरमध्ये लावण्यात आलेल्या क्रांतिकारकांच्या फोटोंच्या रांगेतून टिपू सुलतानचा फोटो हटविण्याची भाजपाने मागणी केली आहे.
नवी दिल्ली - टिपू सुलतानच्या फोटोवरुन नवीन वाद सुरू झाला आहे. दिल्ली विधानसभेच्या कॉरिडोरमध्ये लावण्यात आलेल्या क्रांतिकारकांच्या फोटोंच्या रांगेतून टिपू सुलतानचा फोटो हटविण्याची भाजपाने मागणी केली आहे. टिपू सुलतानचा फोटो कोणत्याही परिस्थितीत हटविण्यात येणार नाही. जबरदस्तीने फोटो हटविला किंवा फोटोला काही नुकसान झालं तर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देत दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष रामनिवास गोयल यांनी भाजपाची ही मागणी फेटाळून लावली आहे.
70 सदस्य संख्या असलेल्या दिल्ली विधानसभेच्या कॉरिडोरमध्ये देशातील 70 क्रांतिकारकांचे फोटो लावण्यात आले आहेत. यामध्ये टिपू सुलतानच्याही फोटोचा समावेश आहे. विशेष म्हणजे जनरल पर्पज कमिटीने निर्णय घेऊन हे फोटो लावले आहेत. संविधानातील कलम 16 च्या तरतुदीनुसार झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्यासह टिपू सुलतानचा फोटो लावण्यात आला आहे. त्यामुळे भारतीय घटनेचे शिल्पकार चुकीचे होते का? त्यावर भाजपानं स्पष्टीकरण द्यायला हवं, असा गोयल यांनी प्रश्न केला आहे.
25 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे कर्नाटकला गेले होते. तेव्हा कर्नाटक विधानसभेला संबोधित करताना त्यांनी टिपू सुलतानचा उल्लेख शहीद असा केला होता, याकडेही गोयल यांनी भाजपाचं लक्ष्य वेधले आहे.