नवी दिल्ली - राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना रांची न्यायालयाने चारा घोटाळ्याच्या चौथ्या प्रकरणातही दोषी ठरवले. न्यायालयाने यापूर्वीही चारा घोटाळ्यासंबंधित तीन प्रकरणांमध्ये लालूंना दोषी ठरवले होते. लवकरच न्यायालय लालूंना शिक्षादेखील सुनावणार आहे. मात्र, लालू यादव यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्यानं रांची येथील रिम्स हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, यावेळी हॉस्पिटलमधील परिचारिकांमध्ये लालू प्रसाद यादव यांची भलतीच क्रेझ पाहायला मिळाली.
यावेळी हॉस्पिटलमधील परिचारिकांनी लालूंसोबत फोटो काढले आहेत. सोशल मीडियावर हे फोटो प्रचंड प्रमाणात व्हायरलदेखील झाले आहेत. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये लालू प्रसाद यादव अगदी चिंतामुक्त दिसत आहेत. कार्डिओलोजी विभागातील डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केल्यानंतर तिथल्या परिचारकांना लालूंसोबत फोटो काढण्याचा मोह अनावर झाला.
लालू प्रसाद यादव चौथ्या खटल्यातही दोषी
दरम्यान, लालूंवर झारखंडमधील डुमका येथील कोषागारातून बेकायदेशीररित्या ३ कोटी १३ लाख रुपये काढल्याचा चौथा आरोप आहे. त्यावरील सुनावणी ५ मार्च रोजीच पूर्ण झाली होती. मात्र, लालूंच्या वतीनं वेळोवेळी करण्यात आलेल्या याचिकांमुळं त्यावरील निर्णय रखडला होता. मात्र 19 मार्चच्या सुनावणीत त्यांना दोषी ठरवण्यात आले. लालूप्रसाद यांच्यावर डिसेंबर १९९५ ते जानेवारी १९९६ दरम्यान दुमका कोषागारमधून १३.१३ कोटी रुपये बोगस पद्धतीने काढल्याचा आरोप आहे.चारा घोटाळ्याच्या पहिल्या प्रकरणात लालूंना २०१३ मध्ये पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. दुस-या प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने लालूंना दोषी ठरवत २३ डिसेंबर २०१७ रोजी साडेतीन वर्षांची शिक्षा सुनावली. याशिवाय चारा घोटाळ्याच्या तिस-या प्रकरणात न्यायालयाने २४ जानेवारी २०१८ ला लालूंना पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. लालूप्रसाद यादव सध्या बिरसा मुंडा कारागृहात शिक्षा भोगत आहेत.
काय आहे चारा घोटाळा?पूर्वी बिहारमध्ये व आता झारखंडमध्ये असलेल्या देवघर येथील सरकारी तिजोरीतून, सन १९९१ ते १९९७ या काळात खोटी बिले बनवून फसवणुकीने ८९.२७ लाख रुपये काढून अपहार केल्याच्या संदर्भात हा खटला होता. प्रत्यक्षात चाऱ्याच्या पुरवठा न करताच कंत्राटदारांच्या नावे असे पैसे काढले जात असल्याचे माहीत असूनही मुख्यमंत्री या नात्याने लालूंनी त्याकडे कानाडोळा केला, असा त्यांच्यावर आरोप होता.
या घोटाळ्याच्या एकूण ३३ खटल्यांपैकी सहा खटल्यांमध्ये लालू प्रसाद आरोपी होते. त्यापैकी दोन खटल्यांमध्ये त्यांना शिक्षा झाली आहे. अन्य चार खटल्यांचे कामकाज याच न्यायालयात सुरू आहे. याआधी चैबासा तिजोरीतून झालेल्या ३७.५ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी लालूंना पाच वर्षांची कैद व २५ लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा झाली होती.
सन २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने लालूंना त्या खटल्यात जामीन दिला. पण शिक्षेला स्थगिती न दिली गेल्याने त्यांना ११ वर्षे कोणतीही निवडणूक न लढण्याची अपात्रता लागू झाली. नव्या शिक्षेने त्यांच्या अपात्रतेचा कालावधी आणखी सहा वर्षांनी वाढेल.