Danish Siddiqui: शरीरात १२ गोळ्या, चेहरा अन् छातीवर गाडीच्या टायरच्या खुणा; हत्येनंतर फरफटलं अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 03:49 PM2021-08-03T15:49:47+5:302021-08-03T15:52:25+5:30
पुलित्झर पुरस्कार विजेता भारतीय छायाचित्रकार दानिश सिद्दीकी यांची १६ जुलै २०२१ रोजी रात्री अफगाणिस्तानच्या कंदाहार येथे वृत्तांकन करताना चकमकीत हत्या झाली.
नवी दिल्ली: प्रतिष्ठित समजला जाणारा पुलित्झर पुरस्कार विजेता भारतीय छायाचित्रकार दानिश सिद्दीकी यांची १६ जुलै २०२१ रोजी रात्री अफगाणिस्तानच्या कंदाहार येथे वृत्तांकन करताना चकमकीत हत्या झाली. दानिश सिद्दीकी हे अफगाण स्पेशल फोर्ससमवेत सोबत होते आणि तेथील तालिबानविरूद्ध त्यांच्या कारवायांचा वृत्तांकन करत होते.
१६ जुलै रोजी अफगाण सैन्याने पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या स्पिन बोल्दक शहरावरील बाजारपेठेवर पुन्हा नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांची तालिबानशी चकमक झाली. या चकमकीत एका अफगान अधिकाऱ्यासह दानिश सिद्दीकी यांचा मृत्यू झाला, अशी माहिती देण्यात आली होती. मात्र दानिशच्या मृत्यूबाबत विविध आणि नवनवीन माहिती समोर येत आहे. दानिश सिद्दीकीच्या वैद्यकीय अहवालानूसार त्याचा मृत्यूनंतरही छळ करण्यात आल्याचे दिसून येत आहे. अफगाणिस्तान आणि भारतीय राष्ट्रीय सुरक्षेतील अनेक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार CNN-News18 याबाबत वृत्त दिलं आहे.
दानिश सिद्दीकी यांच्या शरीरात १२ गोळ्या सापडल्यात. शरीरावर गोळी लागलेल्या ठिकाणी जखमा दिसून आल्या. शरीराच्या आतही अनेक गोळ्या निघाल्या. सर्व गोळ्या धड आणि शरीराच्या मधल्या भागात आढळल्या. शरीराला घसरत नेल्याच्या खुणाही आहेत. हत्येनंतर तालिबान्यांनी मृतदेह फरफटत नेल्याचा संशय आहे. इतकचं नाही तर हत्येनंतर त्यांनी अनेकदा दानिश यांचं डोकं आणि छाती गाडीखाली तुडवले. चेहऱ्यावर आणि छातीवर गाडीच्या टायरच्या खुणा देखील होत्या, असं अहवालातून दिसून येत आहे.
दरम्यान, दानिश सिद्दीकी यांची आम्ही हत्या केलेली नाही, असा दावा तालिबानींकडून करण्यात आला होता. तालिबानचे प्रवक्ते झबीउल्ला मुजाहिद यांनी सांगितले की, युद्धभूमीमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक पत्रकाराने आम्हाला त्यांची माहिती द्यावी. पाकिस्तानच्या सीमेलगत अफगाणी सैनिकांशी तालिबान्यांची जी चकमक झाली, त्याचे वृत्तांकन करताना दानिश सिद्दिकी यांची हत्या करण्यात आली होती.अफगाणिस्तानच्या लष्करी सूत्रांनी सांगितले की, तालिबानींनी स्पिन बोलदाक येथील मुख्य बाजारपेठेचा भाग ताब्यात घेतला आहे, तो त्यांच्या तावडीतून सोडविण्यासाठी संघर्ष सुरू होता.