आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी अनेक जण खूप कष्ट करतात. अशीच एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे. सफराजने प्रचंड गरिबी पाहिली. डोक्यावर नीट छप्पर नव्हतं. दोन वेळचं जेवण मिळणं अवघड झालं होतं. पैशांची कमतरता होती. पण त्याने परिस्थितीसमोर हार मानली नाही. दिवसा कठोर परिश्रम आणि रात्री भरपूर अभ्यास केला. याचाच परिणाम म्हणजे त्याला घवघवीत यश मिळालं.
रोज २०० ते ४०० विटा उचलून मजुरी करून डॉक्टर झालेल्या सफराजची यशोगाथा फिजिक्स वालाचे संस्थापक अलख पांडे यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. जी आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. पश्चिम बंगालमधील एका छोट्या गावात राहणाऱ्या २१ वर्षीय सफराजने NEET २०२४ मध्ये चांगले गुण मिळवले आहेत.
मेहनतीशिवाय NEET उत्तीर्ण होणं मजुरासाठी सोपं नाही. सफराजला कोलकाता येथील नील रतन सरकार मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आहे. शिक्षण पूर्ण करून तो डॉक्टर बनणार आहे. अलख पांडे यांनी ही संपूर्ण यशोगाथा समोर आणली आहे. त्याच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. सफराजची धडपड आणि यश पाहून त्यांनी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत केली.
अलख पांडे यांच्याशी बोलताना सफराजच्या आईने सांगितलं की, त्यांचा मुलगा सकाळी सहा वाजता मजूर म्हणून कामावर जायचा. तो दुपारी दोन वाजता घरी यायचा. त्यानंतर ट्युशनला जायचा. रात्री दहा वाजता जेवण केल्यानंतरही तो अभ्यास करत बसायचा. आई स्वतः कधी रात्री उठून त्याच्यासाठी चहा बनवायची. २ वर्षे दिवसाचे 8 तास कठोर परिश्रम करायचा. कोचिंगसाठी पैसे नव्हते. त्याने अभ्यास करून NEET २०२४ क्रॅक केली.