मोदी सरकारने भासवलेलं चित्र अन् लडाखमधील 'वास्तव' वेगळंच

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 08:34 AM2020-08-28T08:34:39+5:302020-08-28T08:43:35+5:30

शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून सांगण्यात आलंय. लडाख सीमा रेषेवर अद्यापही परिस्थिती गंभीर असल्याचाच रोक या अग्रलेखातून स्पष्टपणे दिसत आहे.   

The picture painted by the Modi government is different from the 'reality' in Andaluk | मोदी सरकारने भासवलेलं चित्र अन् लडाखमधील 'वास्तव' वेगळंच

मोदी सरकारने भासवलेलं चित्र अन् लडाखमधील 'वास्तव' वेगळंच

Next
ठळक मुद्देशिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून सांगण्यात आलंय. लडाख सीमा रेषेवर अद्यापही परिस्थिती गंभीर असल्याचाच रोक या अग्रलेखातून स्पष्टपणे दिसत आहे.   

मुंबई - चीननेलडाखमध्ये गेल्या काही महिन्यांपासून घुसखोरी केली आहे. भारतीय जवानांवर जून महिन्यात भ्याड हल्ला करण्यात आला. त्यामध्ये 20 जवान शहीद झाले होते. यानंतर देशात चीनविरोधात संतापाची लाट आली होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखमध्ये घुसखोरी झाली नसल्याचे सांगितले होते. आता सीडीएस जनरल रावत यांच्यानंतर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीच, लडाखमध्ये परिस्थिती गंभीर असल्याचे कबूल केले आहे. त्यावरुन शिवसेननं मोदी सरकारवर टीकेचे बाण सोडत लडाखमधील वास्तव वेगळंच असल्याचं म्हटलंय.   

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी लडाखमधील परिस्थिती 1962 नंतर सर्वात गंभीर बनली असल्याचे म्हटले आहे. जयशंकर यांनी त्यांचे पुस्तक अनावरण करण्याआधी रेडिफला मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यांनी सध्या 1962 नंतर सर्वांत गंभीर परिस्थिती ओढवली असल्याचे कबूल केले आहे. गेल्या 45 वर्षांत पहिल्यांदा एलएसीवर आमच्या सैनिकांना हौतात्म्य आले. सीमेवर दोन्ही देशांकडून मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात करण्यात आल्याचे जयशंकर यांनी म्हटले. पररराष्ट्रमंत्र्यांच्या या विधानानंतर लडाखमधील परिस्थिती व वास्तव वेगळंच असल्याच स्पष्ट होतंय, असे शिवसेनेनं म्हटलं आहे. 

गलवान प्रकरणानंतर 'पेटलेले' लडाख आजही धगधगते आहे, ही वस्तुस्थिती आहे. परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी त्यावर बोट ठेवले आहे. 1962च्या इतिहासाची पुनरावृत्ती हिंदुस्थानी सैन्य होऊ देणार नाही. तथापि 1962 एवढीच गंभीर परिस्थिती लडाखमध्ये सध्या आहे हे नाकारता येणार नाही. मागील काळात एक चित्र रंगवले गेले असले तरी लडाखमधील 'वास्तव' हेच आहे. लडाखच्या सीमेवर नेमकी काय परिस्थिती आहे आणि चीनच्या तेथील कारवाया किती थंडावल्या आहेत या प्रश्नाचे उत्तर आता देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांनीच देऊन टाकले आहे, असेही शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून सांगण्यात आलंय. लडाख सीमा रेषेवर अद्यापही परिस्थिती गंभीर असल्याचाच रोक या अग्रलेखातून स्पष्टपणे दिसत आहे.   

परराष्ट्रमंत्र्यांचे विधान

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी एका मुलाखतीत असे म्हटल्याचे प्रसिद्ध झाले आहे की, लडाखमधील परिस्थिती खूपच गंभीर आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार 1962 नंतर लडाखमध्ये सध्या गंभीर आणि नाजूक स्थिती ओढवली आहे. परराष्ट्र मंत्र्यांचे हे भाष्य अनेक दृष्टींनी महत्त्वपूर्ण आहे. मागील काही महिन्यांपासून चीनने आपल्या सीमांवर कारवाया सुरू केल्या आहेत. जून महिन्यात लडाखमध्ये काही किलोमीटर घुसखोरी करून चिन्यांनी त्यांचे आक्रमक इरादे स्पष्ट केले होते. पाठोपाठ गलवान खोऱ्यात हिंदुस्थानी आणि चिनी सैनिकांत धुमश्चक्री झाली. चिनी सैन्याने आपल्या सैनिकांवर भ्याड हल्ला केला. आपल्या बहादूर जवानांनीही त्यांना जोरदार मूंहतोड जबाब दिला. या धुमश्चक्रीत आपले 18 जवान शहीद झाले. मात्र चिन्यांचे 35-40 सैनिक ठार झाले होते. तेव्हापासून लडाख सीमा प्रचंड तणावग्रस्त झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्या ताज्या खुलाशाकडे पाहायला हवे. मागील दोन महिन्यांत हिंदुस्थान-चीन परस्पर संबंधात आणि चीनबरोबरच्या व्यापार-व्यवहारांमध्ये निश्चितपणे काही ठोस घडामोडी
घडल्या आहेत. 

फिल गुड वातावरण निर्माण झाले, पण...

चिनी सीमेवर लडाखपासून अरुणाचलपर्यंत आपणही लष्कराची जमवाजमव केली आहे. लष्कराची जय्यत तयारी केली आहे. आपल्या लष्करप्रमुखांनी संपूर्ण सीमाभागाला भेटी दिल्या आहेत. पंतप्रधानांनीदेखील लडाखला भेट देऊन आपल्या जवानांचे मनोबल वाढवले. हिंदुस्थानी वायुदलाचा नवीन पाहुणा असलेल्या 'राफेल' विमानांनीही सीमेवर घिरट्या घालून चिनी ड्रॅगनला इशारा दिला. दुसऱ्या बाजूने 40-50 चिनी ऍप्सवर बंदीची कुऱ्हाड चालवून आपण चीनला आर्थिक तडाखेदेखील दिले. ज्या गलवान खोऱ्यातील धुमश्चक्रीमुळे दोन्ही देशातील तणाव पराकोटीला पोहोचला त्या क्षेत्रातून चीन काही पावले मागे सरकला असेही स्पष्ट झाले. त्यामुळे चीन काही प्रमाणात का होईना, पण नरमला असे 'फिल गुड' वातावरण देशभरात निर्माण झाले. मात्र, आता परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनीच 'लडाख'मध्ये 1962 नंतर सर्वात गंभीर परिस्थिती ओढवली आहे, असे म्हटल्याने या वातावरणाला धक्का बसू शकतो. थोडक्यात, लडाख सीमेवरील नेमके चित्रं कसे आहे हे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. तणाव कमी झाला असे वरकरणी भासत असले तरी वस्तुस्थिती वेगळी आहे. तणाव कायमच आहे. असाच परराष्ट्र मंत्र्यांच्या स्पष्टीकरणाचा एकंदर सूर आहे. म्हणजे लडाख सीमेवरील चिनी संकट कायमच आहे. 

वास्तव हेच आहे

चिनी ड्रगनच्या तेथील कारवाया थांबलेल्या नाहीत आणि त्यांचे इरादेही बदललेले नाहीत. चिनी आणि भारतीय लष्करादरम्यान चर्चेच्या फैरी झडत असल्या तरी लडाख सीमेवर दोन्ही देशांच्या बंदुका एकमेकांवर रोखलेल्याच आहेत. चीनने लडाखमधून माघार घ्यावी असा भारताचा आग्रह आहे तर भारतानेही 'फिंगर चार'पासून आपल्या हद्दीत जावे असा चीनचा हट्ट आहे. तो अर्थातच भारताला अमान्य आहे आणि ते स्वाभाविक आहे. चिन्यांचे असे उफराटे धोरण नेहमीचेच आहे. माझे ते माझे आणि तुझे तेदेखील माझे याच पद्धतीने त्यांची दडपशाही सुरू असते. लडाखमध्ये यापेक्षा वेगळे घडलेले नाही. 1962चा भारत आज नाही, तो कितीतरी बलवान झाला आहे हे मान्य केले तरी घुसखोरी करून भूमी बळकावण्याची चिन्यांची खुमखुमी कमी झालेली नाही. म्हणूनच लडाखची सीमा त्यांना धगधगतीच ठेवायची आहे. ही धग कमी व्हायला हवी. तसे प्रयत्न सुरू असले तरी गलवान प्रकरणानंतर 'पेटलेले' लडाख आजही धगधगते आहे, ही वस्तुस्थिती आहे. परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी त्यावर बोट ठेवले आहे. 1962च्या इतिहासाची पुनरावृत्ती भारतीय सैन्य होऊ देणार नाही. तथापि 1962 एवढीच गंभीर परिस्थिती लडाखमध्ये सध्या आहे हे नाकारता येणार नाही. मागील काळात एक चित्र रंगवले गेले असले तरी लडाखमधील 'वास्तव' हेच आहे.
 

Web Title: The picture painted by the Modi government is different from the 'reality' in Andaluk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.