नवी दिल्ली- माजी केंद्रीय मंत्री व भाजपा नेते यशवंत सिन्हा यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे. अमित शाह यांचे पुत्र जय शहा यांच्या बचावासाठी पीयूष गोयल यांनी पुढे यावे हे कोणत्याही प्रकारे पटण्यासारखं नाही, असं यशवंत सिन्हा म्हणाले आहेत.पीयूष गोयल हे रेल्वेमंत्री असण्याऐवजी जय शाह यांच्या कंपनीचे चार्टर्ड अकाऊंटंट असल्यासारखे बचाव करतायत. जय शाह यांच्या टेम्पल इंटरप्रायजेस लिमिटेडमध्ये घोटाळा झाला असल्यास ते चौकशीअंती समोर येईल, परंतु पीयूष गोयल यांच्यासह उत्तर प्रदेशचे एक मंत्री व अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ज्या पद्धतीनं कंपनीच्या बाजूने उभे राहिले. त्यामुळे मला धक्काच बसला आहे, असं यशवंत सिन्हा म्हणाले आहेत.केंद्रीय मंत्र्यांच्या अशा वागणुकीमुळे जनतेमध्ये भाजपाची प्रतिमा मलिन होतेय. यशवंत सिन्हा म्हणाले, जय शाह यांच्या कंपनीची ज्यांच्याशी देवाण-घेवाण झाली, ते मला मीडियामधूनच समजलं. परंतु एका नागरिकाच्या बचावासाठी केंद्रीय मंत्री ज्या पद्धतीनं समोर येतात ते चिंताजनक आहे. या उलाढालीत कदाचित कोणताही गैरव्यवहार नसेलही, जय शाह हे स्वतः व्यापारी आहेत. ते स्वतःचा बचाव स्वतः करू शकतात. जय शाह यांनी बदनामीचा फौजदारी खटला भरला आहे. त्यांचा बचाव अतिरिक्त सॉलिसिटर जनरल करणार आहेत. सरकारचे कायदा विषयक सल्लागार असतानाही अतिरिक्त सॉलिसिटर जनरल जय शाह यांचा खटला लढतायत. सॉलिसिटर जनरलपदाचा दुरुपयोग करूनही त्यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही, असंही सिन्हा म्हणाले आहेत.गेल्या काही दिवसांपूर्वी देशाच्या अर्थव्यवस्थेवरून केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर सडकून टीका करणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. अर्थव्यवस्थेचं वस्त्रहरण होत असताना मी शांत बसणार नाही असं सांगत यशवंत सिन्हा यांनी आपला बंड अद्याप कायम राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. 2019 मध्ये जेव्हा आम्ही निवडणुकाला उभे राहू तेव्हा लोक आम्हाला तुम्ही केलेल्या आश्वासनांचं काय झालं असं विचारणार आहेत, असं यशवंत सिन्हा म्हणाले आहेत. 2019 मध्ये जेव्हा आम्ही निवडणुकीला उभे राहू तेव्हा आम्ही यूपीएने काय केलं होतं हे सांगत बसू शकत नाही. आम्हाला आम्ही गेल्या निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचं काय झालं याचं उत्तर द्यावं लागेल असं यशवंत सिन्हा म्हणाले होते. 80 -85 लाख लोकांना रोजगार मिळाल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला होता. मात्र यावर खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे असंही यशवंत सिन्हा बोलले होते. अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी काय सल्ला द्याल असं विचारला असता मी कोणताही सल्ला देणार नाही. मी तेवढा सक्षम नाही, माझ्यापेक्षा मोठे लोक सरकारमध्ये आहेत असा टोला यशवंत सिन्हा यांनी लगावला. मी जे केलं त्याचा अभ्यास केला तरी भाजपाला अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतील असंही यशवंत सिन्हा म्हणाले होते.
अमित शाहांच्या मुलाच्या कंपनीच्या उलाढालीत 16 हजार पटींची वाढ2014चं सरकार बदलल्यानंतर अमित शाह यांच्या मुलाचंही नशीब फळफळलं आहे, असा आरोप काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी केला आहे. सिब्बल यांच्या मते, अमित शाह यांच्या मुलाची कंपनी टेम्पल इंटरप्रायजेस प्रायव्हेट लिमिटेड मार्च 2013मध्ये तोट्यात होती. त्यावेळी कंपनीला 6,239 रुपयांचं नुकसान झाल्याचं दाखवण्यात आलं होतं. तसेच मार्च 2014मध्येही कंपनीला 1724 रुपयांचा तोटा झाला होता. परंतु 2014-15नंतर कंपनीला मोठा फायदा झाल्याचं समोर आलं आहे. मे 2014नंतर कंपनीनं मोठ्या प्रमाणात प्रगती केली असून, त्या आर्थिक वर्षात कंपनीला 18,728 रुपयांचा फायदा झाला आहे. कंपनीचा एकूण महसूल फक्त 50 हजार रुपये होता. मात्र खरा बदल हा 2015-16नंतर घडला आहे. 2015-16च्या आर्थिक वर्षात कंपनीची उलाढाल 80 कोटी झाली आहे. एका वर्षात कंपनीच्या उलाढालीत 16 हजार पटीनं वाढ झाली आहे.