नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याकडे असलेला अर्थमंत्रीपदाचा अतिरिक्त कार्यभार रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांच्याकडे तात्पुरता देण्यात आला आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यंदाचा अर्थसंकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे केंद्रीय अर्थमंत्रीपदाचा अतिरिक्त कार्यभार रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आला आहे. 1 फेब्रुवारी रोजी यंदाचा वार्षिक अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. यादरम्यान अर्थमंत्री अरुण जेटली अनुपस्थित राहिल्यास पीयुष गोयल हेच यंदाचा अर्थसंकल्प सादर करतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, अर्थमंत्री अरुण जेटली उपचारासाठी अमेरिकेत गेले आहेत. अरुण जेटली यांच्या मांडीत कॅन्सरची गाठ असून त्यावर लवकर उपचार न केल्यास शरीराच्या इतर अवयवांनाही त्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अरुण जेटली उपचारांसाठी अमेरिकेला गेले आहेत. अरुण जेटली यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या शस्त्रक्रियेसाठी अधिकवेळ अरुण जेटलींना अमेरिकेतच राहावे लागणार आहे. त्यामुळे येत्या अंतरिम अर्थसंकल्पाला अरुण जेटली हजर राहण्याची शक्यता कमी आहे.