नवी दिल्ली - बीएस येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर कर्नाटक विधानसभेबाहेर काँग्रेस व जेडीएसनं जल्लोष साजरा केला. ''आमच्याकडे बहुमत नाही, त्यामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा देतो आहे'', असं म्हणत येडियुरप्पा यांनी विधानसभेत आपण राजीनामा देत असल्याची घोषणा केली. त्यामुळे येडियुरप्पा अवघ्या अडीच दिवसांचे मुख्यमंत्री ठरले आहेत. कर्नाटकमध्ये येडियुरप्पा सरकार पडल्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहीत भाजपावर जोरदार हल्लाबोल चढवला.
''देशाच्या जनतेनं पाहिलं की कर्नाटक विधानसभेमध्ये राष्ट्रगीताआधीच भाजपा आमदार आणि हंगामी अध्यक्षांनी सभागृह सोडलं. देशाच्या कोणत्याही संस्थेचा आदर करायचा नाही, हाच त्यांचा स्वभाव आहे. लोकशाहीला विकत घेतलं जाऊ शकत नाही, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि हत्येचे आरोपी अमित शाह यांना कर्नाटकच्या जनतेनं दाखवून दिल्याचा मला अभिमान आहे'', अशा शब्दांत राहुल गांधी यांनी भाजपावर हल्ला केला आहे. सर्वोच्च न्यायालय किंवा अन्य घटनात्मक संस्थांचा भाजपा आदर करत नाही, असा आरोपदेखील यावेळी राहुल गांधी यांनी केला.
भ्रष्टाचाराविरोधात बोलणारे पंतप्रधान मोदीच भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देत आहेत.भाजपा, पंतप्रधान, अमित शाह यांनी काँग्रेस-जेडीएसच्या आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, देशात पैसा आणि सत्ताच सर्व काही नसल्याचं जनतेनं दाखवून दिलं आहे. यावरुन भाजपा आणि आरएसएसनं धडा घेतला असेल, अशी अपेक्षा आहे. असेही राहुल गांधी यांनी म्हटले.
'पंतप्रधान देश, सुप्रीम कोर्ट, जनता आणि लोकशाहीपेक्षा मोठा नसतो. मोदींनी संस्थांचा सन्मान करावा', अशा शब्दांत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. शिवाय, "पंतप्रधानांचं मॉडेल लोकशाहीचं नाही तर हुकुमशाहीचं आहे. मात्र विरोधक एकत्र येऊन भाजपाला पराभूत करतील. आम्ही भाजपा आणि आरएसएसला रोखणार. काँग्रेस या देशाच्या संस्था आणि जनतेचं संरक्षण करेल," असा दावादेखील राहुल गांधी यांनी केला.