नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी जम्मू-काश्मीरमधील नौशेरात पोहोचले आहेत. जवानांना भेटून मोदी त्यांच्यासोबत दिवाळी साजरा करणार आहेत. आज सकाळी पंतप्रधान मोदी दिल्लीहून जम्मूसाठी रवाना झाले. विशेष म्हणजे मोदींनी कोणत्याही व्हीआयपी रुटशिवाय दिल्ली ते जम्मू प्रवास केला. या दरम्यान त्यांच्या वाहनांचा ताफा दिल्लीतील ट्रॅफिक सिग्नलवरदेखील थांबला.
पंतप्रधान मोदींच्या ताफ्यात असलेली वाहनं आज सकाळी दिल्लीहून निघाली. या ताफ्यासाठी कोणताही व्हीआयपी रुट नव्हता. या प्रवासादरम्यान वाहनांचा ताफा दिल्लीतील एका सिग्नलवर थांबला होता. पंतप्रधान मोदी सध्या नौशेरामध्ये असून ते जवानांशी संवाद साधत आहेत. नौशेराचं महत्त्व, देशाच्या स्वातंत्र्यानंतर नौशेरावर झालेला हल्ला आणि नौशेरातून शत्रूला मिळालेलं जोरदार प्रत्युत्तर यांचा विशेष उल्लेख मोदींनी त्यांच्या भाषणात केला आहे.
पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी दरवर्षी सीमेवर जाऊन दिवाळी साजरी करतात. याआधी मोदींनी जम्मू-काश्मीर, उत्तराखंडमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी केली आहे. पंतप्रधान झाल्यानंतर २०१४ मध्ये मोदी दिवाळी साजरी करण्यासाठी सियाचिनला गेले होते. २०१६ मध्ये मोदींनी उत्तराखंडातल्या चमोली जिल्ह्यामधील माणा येथे आयटीबीपीच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली. इथून काही अंतरावर भारत-चीन सीमा आहे.