नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चालक विरहित मेट्रो सेवेचा शुभारंभ केला आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मोदींनी या सेवेचं लोकार्पण केलं. पहिल्या टप्प्यात मजेंटा लाईनच्या जनकपुरी पश्चिम ते नोएडाच्या बॉटनिकल गार्डन स्थानकांदरम्यान चालकविरहित मेट्रो गाड्या धावतील. त्यानंतर या सेवेचा विस्तार होईल. २०२५ पर्यंत देशातल्या २५ पेक्षा अधिक शहरांमध्ये मेट्रो सुरू होईल, असं मोदींनी चालकविरहित सेवेचं लोकार्पण केल्यानंतर म्हटलं.तीन वर्षांपूर्वी मजेंटा लाईनवर मेट्रो सेवा सुरू झाली. त्यानंतर आता याच मार्गावर चालकविरहित मेट्रो सेवा सुरू होत आहे. भविष्यातील गरजांचा विचार करून देश पुढे जात आहे, असं पंतप्रधानांनी सेवेचा शुभारंभ केल्यानंतर म्हटलं. 'काही वर्षांपूर्वी संभ्रमाचं वातावरण होतं. भविष्याची तयारी नव्हती. त्यामुळे पायाभूत सुविधांची मागणी आणि प्रत्यक्षात उभारल्या जाणाऱ्या सुविधा यांच्यात मोठं अंतर होतं. शहरीकरणाला आव्हान मानून आपण त्याचं रुपांतर संधीत करायला हवं,' असं मत मोदींनी व्यक्त केलं.मेट्रोच्या चालकविरहित सेवेचं उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या कार्याचा खास उल्लेख केला. 'वाजपेयी यांच्या प्रयत्नांमुळेच दिल्लीला पहिली मेट्रो मिळाली. आम्ही सत्तेत आलो तेव्हा ५ शहरांमध्ये मेट्रो सेवा होती. आता १८ शहरांमध्ये मेट्रो धावते आहे. २०२५ पर्यंत २५ पेक्षा अधिक शहरांमध्ये मेट्रो सेवा सुरू झालेली असेल. देशात होत असलेल्या अशा बदलांमुळे सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात बदल होतो. आधी मेट्रो सेवेबद्दल कोणतंही स्पष्ट धोरण नव्हतं. मात्र आम्ही मेट्रो सेवेवर वेगानं काम केलं,' असं मोदी म्हणाले.