नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. 'नरेंद्र मोदींनी सर्व काही विकायला काढलं आहे. त्यांनी मनात आणलं तर ते ताजमहालही विकतील' असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा, काँग्रेस आणि आपने जोरदार तयारी सुरू केली आहे. विधानसभेसाठी 8 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, 11 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. दिल्लीमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.
'पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मेक इन इंडियाची घोषणा केली आहे. ही घोषणा खूपच लोकप्रिय झाली आहे. मात्र इंडियन ऑईल, एअर इंडिया, हिंदुस्थान पेट्रोलियम, रेल्वे, लाल किल्ला हे सर्व ते विकायला निघाले आहेत. एवढंच काय मनात आलं तर उद्या ते ताजमहालही विकतील' अशी घणाघाती टीका राहुल गांधी यांनी मोदींवर केली आहे. तसेच भाजपाचे काही नेते देशभक्तीबाबत बोलतात. पाकिस्तानच्या नावाने खडे फोडत आहेत. पाकिस्तानात जाऊन भारतमाता की जय म्हणण्याची हिंमत दाखवणारा एक तरी भाजपाचा नेता दाखवा, असं आव्हान देखील राहुल गांधी यांनी दिलं आहे.
राहुल गांधी यांनी भाजपासह आम आदमी पार्टीवरही टीका केली आहे. आप आणि भाजपा हे दोन्ही पक्ष काम करत नाहीत तर यांचा भर हा केवळ मार्केटिंग करण्यावर असतो. नरेंद्र मोदींनी दरवर्षी 2 कोटी लोकांना नोकरी देण्याचं आश्वासन दिलं होतं. कुठे आहेत नोकऱ्या? दिल्लीत केजरीवाल यांनी रोजगारासाठी काय केलं? असा सवालही त्यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी आर्थिक मोर्च्यावर केंद्र सरकारला घेरलं होतं. राहुल गांधींनी आपल्या ट्विटवर नरेंद्र मोदी योगा करत असलेला व्हिडीओ पोस्ट केला होता. बजेटवर टीका करत राहुल गांधींनी मोदींना पुन्हा एकदा योगा करण्याचा सल्ला दिला.
2020-21च्या बजेटवर टीका करत त्यात काहीही नसल्याचं सांगितलं. बेरोजगारीशी दोन हात करण्यासाठी मोदी सरकारनं काहीही प्रयत्न केलेले नाहीत. बजेटमधून रोजगार निर्माण होतील अशी कोणतीही उपाययोजना केल्याचं मला दिसलेलं नाही असं म्हटलं होतं. इतिहासातील सर्वात मोठं आणि लांब भाषणाचा हा बजेट असू शकतो, परंतु यात काहीही ठोस असं नाही. यात जुन्या गोष्टी पुन्हा पुन्हा नव्यानं सांगण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचा अर्थमंत्र्यांचा दावा पोकळ आहे. त्यात काहीही तथ्य नाही. कृषी विकासदर दोन टक्क्यांवर आला आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होण्यासाठी कृषी विकासदर 11 टक्क्यांवर असला पाहिजे, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा यांनी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या
IND vs NZ, 1st ODI Live Score: भारताचे दोन्ही सलामीवीर माघारी, किवींचे कमबॅक
केंद्र सरकारकडून राज्याची आर्थिक कोंडी; उद्धव ठाकरेंचा आरोप
'...तेव्हा पर्यावरणप्रेम कुठे गेले होते?; शिवसेनेच्या हट्टापायी तीनशे कोटींचे नुकसान'
औरंगाबादेत हिंगणघाटची पुनरावृत्ती; घरात घुसण्यास विरोध केल्याने महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न