बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न देण्याची काँग्रेसची तयारी नव्हती; राज्यसभेतून मोदींचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 03:06 PM2024-02-07T15:06:42+5:302024-02-07T15:11:04+5:30
PM Modi Rajya Sabha Speech: राज्यसभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली.
मंगळवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेतून विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. त्यानंतर आज राज्यसभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. काँग्रेसला फटकारताना मोदींनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ते म्हणाले की, बंगालमधून त्यांच्यासमोर आव्हान आले आहे की, काँग्रेस आगामी लोकसभा निवडणुकीत ४० जागा देखील जिंकू शकणार नाही. मी त्यांच्यासाठी ४० जागा याव्यात अशी प्रार्थना करतो, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसला टोला लगावला. आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही पंतप्रधानांनी काँग्रेसवर सडकून टीका केली.
मोदी म्हणाले की, मला वाटते की जर बाबासाहेब आंबेडकर नसते तर ST SC ला आरक्षण मिळाले असते की नाही याबाबत मला शंका वाटते. भाजपाच्या सहकार्यामुळे बाबासाहेबांना भारतरत्न देण्यात आला. बाबासाहेबांचे विचार आणि त्यांचे राजकारण संपवायला काँग्रेसवाले निघाले होते. तेव्हा निवडणुकांमध्ये ते काय बोलले हे सगळ्यांना माहिती आहे, सर्वकाही उघड आहे. बाबासाहेबांना भारतरत्न द्यायची काँग्रेसची तयारी नव्हती. भाजपाच्या समर्थनाने सरकार बनल्यानंतर त्यांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. काँग्रेसने सीताराम केसरीचे काय केले ते देशाने पाहिले. देशात पहिल्यांदाच एका पक्षाने आदिवासी समाजाच्या महिलेला राष्ट्रपती केले. काँग्रेसचा निषेध वैचारिक नव्हता, त्यांचा निषेध आदिवासी महिलेच्या विरोधात होता.
राज्यसभेतून मोदींचा घणाघात
तसेच जुन्या सभागृहात देशाच्या पंतप्रधानांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, तुम्ही माझा आवाज दाबू शकत नाही. या आवाजाला देशातील जनतेने बळ दिले आहे. काँग्रेसने सत्तेसाठी लोकशाहीचा गळा दाबला. काँग्रेसने लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सरकारांना बरखास्त केले. काँग्रेसने देशाच्या संविधानाला बंदीस्त केले, काँग्रेसने वृत्तपत्रांवर टाळे लावले, काँग्रेसने तेव्हा देशाला तोडले आणि आता उत्तर-दक्षिण तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. हे काँग्रेस आम्हाला लोकशाही शिकवत आहे, असेही पंतप्रधान मोदींनी नमूद केले.
काँग्रेसने ओबीसीला आरक्षण दिले नाही, त्यांनी सामान्य वर्गातील कुटुंबाना आरक्षण दिले नाही. बाबासाहेब आंबेडकर नसते, तर दलितांना आरक्षण मिळाले नसते. याच काँग्रेसने बाबासाहेबांना भारतरत्न न देता आपल्या कुटुंबातील सदस्यांना देत राहिले. भाजपाच्या मदतीने सरकार सत्तेत आल्यानंतर बाबासाहेबांना भारतरत्न दिला गेला. त्यांनी रस्त्या-रस्त्यांना आपल्या कुटुंबाची नावे दिली. या काँग्रेस नेत्यांची गॅरंटी राहिली नाही, पक्षाची गॅरंटी राहिली नाही आणि हे मोदीच्या गॅरंटीबद्दल बोलत आहेत. त्यांच्या कार्यकाळात देश नाराज झाला. देशाला इतका राग का आला, हे आमच्यामुळे झाले नाही, तर त्यांच्या स्वतःच्या कर्माची फळे त्यांना मिळाली आहेत. आम्ही देशाला अडचणीतून बाहेर आणले, म्हणूनच देश आम्हाला आशीर्वाद देत आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले.