नवी दिल्ली: गेल्या वर्षभरापासून केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आता मोठं यश मिळालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. देशवासीयांना संबोधित करताना मोदींनी हा निर्णय घोषित केला आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी त्यांच्या घरी जावं, शेतात जाऊन काम सुरू करावं, एक नवी सुरुवात करावी, असं आवाहन मोदींनी केलं.
देशाला संबोधित करताना काय म्हणाले मोदी?- देशात तीन कृषी कायदे आणण्यामागे उद्देश हा होता की देशातील शेतकऱ्यांना खास करून छोट्या शेतकऱ्यांना बळ मिळावं.. शेतमालाला योग्य किंमत मिळावी आणि शेतमाल विकण्यासाठी जास्त पर्याय मिळावेत.- अनेक वर्षांपासून ही मागणी शेतकरी, शेती तज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, संघटना करत होत्या. आधीही अनेक सरकारांनी मंथन केलं... यावेळीही संसदेत चर्चा झाली आणि मग हे कायदे आणण्यात आले. कानाकोपऱ्यात शेतकऱ्यांनी, संघटनांनी स्वागत केलं. त्यांचा मी आभारी आहे.
- शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी, कृषी जगताच्या हितासाठी, देशाच्या हितासाठी, गाव-गरिबांच्या उन्नतीसाठी, शेतकऱ्यांप्रती समर्पण भावनेनं, प्रामाणिक हेतूनं कायदे सरकारनं केले. पण ही पवित्र बाब, शेतकऱ्यांच्या हिताची बाब प्रयत्न करूनही आम्ही शेतकऱ्यांना समजू शकलो नाही.- भले शेतकऱ्यांचा एक वर्ग या कायद्यांना विरोध करत होता. तरीही आमच्यासाठी हे महत्त्वाचं होतं. अर्थशास्त्रज्ञ, प्रगतीशील शेतकऱ्यांनी, तज्ज्ञांनी त्यांना हे कायदे समजावण्याचा प्रयत्न केला. नम्रपणे, मोकळ्या मनानं त्यांच्या शंका दूर करण्याचे प्रयत्न केले. अनेक माध्यमांद्वारे, व्यक्तिगत आणि सामूहिक संवाद साधला. शेतकऱ्यांची मतं, तर्क समजून घेण्यातही कसूर ठेवली नाही.
- कायद्यातील ज्या तरतुदींबद्दल आंदोलक शेतकऱ्यांना आक्षेप होता, त्या बदलण्याची तयारी सरकारनं दर्शवली. दोन वर्षांसाठी कायदे निलंबित करण्याचाही प्रस्ताव दिला. सुप्रीम कोर्टातही हे प्रकरण गेलं.- आज देशवासियांची क्षमा मागून, प्रामाणिकपणे मी म्हणू इच्छितो की आमचे प्रयत्नच कुठेतरी कमी पडले. त्यामुळेच आम्ही शेतकऱ्यांना चांगले कायदे समजावू शकलो नाही.- आज गुरुनानकांचं पवित्र प्रकाश पर्व आहे. ही वेळ कुणालाही दोष द्यायची नाही. आज मी पूर्ण देशाला हे सांगायला आलो आहे की आम्ही तीन कृषी कायद्यांना मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. या महिनाअखेरीस सुरू होणाऱ्या संसद अधिवेशनात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करू.- आंदोलक शेतकऱ्यांना मी विनंती करतो की आज पवित्र दिन है. आपापल्या घरी परत जा, शेतात जा, परिवाराकडे जा. नवी सुरुवात करू या...