पंतप्रधान मोदींची गिफ्ट डिप्लोमसी, अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांना दिली खास भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 04:30 PM2021-09-24T16:30:26+5:302021-09-24T16:44:50+5:30
PM Narendra Modi in America: शुक्रवारी मोदींनी अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्यासोबत यशस्वी चर्चा केली. तसेच त्यांना खास भेटवस्तूही दिल्या. आता या भेटवस्तूंची चर्चा सुरू आहे.
वॉशिंग्टन - कोरोना विषाणूची साथ सुरू झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच परदेश दौऱ्यावर गेले आहेत. तीन दिवसांच्या या दौऱ्यादरम्यान, मोदी क्वाड समुहाच्या सदस्यांशी चर्चा करणार आहेत. विशेष बाब म्हणजे सर्व बैठकांदरम्यान पंतप्रधान मोदी विविध नेत्यांना काही मौल्यवान भेटवस्तूही देत आहेत. शुक्रवारी मोदींनी अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्यासोबत यशस्वी चर्चा केली. तसेच त्यांना खास भेटवस्तूही दिल्या. आता या भेटवस्तूंची चर्चा सुरू आहे. (PM Modi's Gift Diplomacy, Special Visit to US Vice President Kamala Harris)
गुरुवार २३ सप्टेंबरपासून सुरू झालेला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा अमेरिका दौरा २५ सप्टेंबर रोजी समाप्त होणार आहे. पहिल्या दिवशी दिग्गज कंपन्यांच्या पाच सीईओंबत बैठक घेऊन दौऱ्याला सुरुवात झाली. आता आज मोदी क्वाड समुहातील जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या देशांच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. तर शनिवारी दौऱ्याच्या अखेरीस पंतप्रधान मोदी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला संबोधित करतील. तर रविवारी ते नवी दिल्लीसाठी रवाना होतील.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांना त्यांचे आजोबा श्री. पी.व्ही. गोपालन यांच्याशी संबंधित काही जुन्या माहितीच्या प्रति भेट म्हणून दिल्या. या प्रति हस्तशिल्प फ्रेममध्ये सजवण्यात आलेल्या आहेत. श्री. गोपालन वरिष्ठ आणि सन्मानित सरकारी अधिकारी होते. त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण पदांवर काम पाहिले होते. याशिवाय पंतप्रधान मोदींनी कमला हॅरिस यांना गुलाबी मीनाकारी असलेला बुद्धिबळाचा सेटही भेट म्हणून दिला.
गुलाबी मीनाकारीचे हे शिल्प जगातील सर्वात जुन्या शहरापैकी एक असलेल्या काशीशी निगडित आहे. हा पंतप्रधान मोदींचा मतदारसंघ आहे. बुद्धिबळाच्या या सेटमधील एक एक मोहरा बारीक कलाकुसर करून हाताने तयार करण्यात आला आहे. यामध्ये काशीचा जिवंतपणा दिसून येतो.
दरम्यान, शुक्रवारी कमला हॅरिस यांच्याशी झालेल्या चर्चेपर्वी पंतप्रधान मोदींनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्याशी चर्चा केली. त्यांनी मॉरिसन यांना चांदीची मीनाकारी असलेले जहाज भेट दिले. हे जहाजसुद्धा हातांनी तयार करण्यात आले होते.
तर जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांच्याशी झालेल्या भेटीवेळी मोदींनी त्यांना चंदनाची बुद्ध मूर्ती भेट दिली. जपान आणि भारताला एकत्र आणण्यामध्ये बौद्ध धर्माची मोठी भूमिका आहे. जपानच्या आधीच्या दौऱ्यांदरम्यानही मोदी बौद्ध मंदिरात गेले होते.